क्राईम रेकॉर्ड नाही तरीही थेट दरोडा !
By Admin | Updated: October 5, 2016 00:18 IST2016-10-05T00:18:48+5:302016-10-05T00:18:48+5:30
गुन्हेगारी वर्तुळाशी फार काही संबंध नाही, पोलीस दप्तरी शिरावर गुन्हेही नाही, गुन्ह्यांचा कोणताही अनुभवही नाही,

क्राईम रेकॉर्ड नाही तरीही थेट दरोडा !
नवख्यांचे धाडस पाहून पोलीसही चक्रावले
यवतमाळ : गुन्हेगारी वर्तुळाशी फार काही संबंध नाही, पोलीस दप्तरी शिरावर गुन्हेही नाही, गुन्ह्यांचा कोणताही अनुभवही नाही, तरीही त्यांनी थेट दरोड्याची योजना आखली आणि ती पूर्णत्वासही नेली. नागपुरातील नवख्या तरुणांचे हे धाडस पाहून यवतमाळ आणि नागपूरचे पोलीसही चक्रावून गेले.
कोणताही गुन्हा घडला की, पोलीस आधी तशा स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेतात. घटनेच्यावेळी ते कोठे होते, यावर लक्ष केंद्रीत केले जाते. कोणत्याही गुन्ह्यात नवख्यांचा सहभाग असेल या निष्कर्षावर सुरुवातीला पोलीस कधीच येत नाहीत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरच संपूर्ण तपास केंद्रीत होतो. परंतु पोलिसांना आता आपला तपासाचा हा परंपरागत पॅटर्न बदलवावा लागणार आहे. कारण नागपुरातील नवख्या गुन्हेगारांनी पोलिसांचा हा पॅटर्न आपल्या ‘पराक्रमाने’ खोटा ठरविला.
सेमिनरी ले-आऊटमधील अनिल खिवंसरा यांच्याकडे पडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातही पोलिसांनी आपला परंपरागत पॅटर्नच वापरला असता. परंतु यातील आरोपींचे चेहरे, वाहन सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट झाल्याने पोलिसांचे तपासाचे काम बऱ्यापैकी हलके झाले होते. त्यामुळे या चेहऱ्यांवरच तपास केंद्रीत केला गेला. घटनास्थळी अग्नीशस्त्रासह सापडलेली कॅरीबॅग, सीसीटीव्हीमधील चेहरे आणि वाहनाचा पाठलाग करीत पोलिसांनी हा गुन्हा लगेच ‘डिटेक्ट’ केला. या टोळीचे बहुतांश सदस्य हाती लागल्यानंतर त्यांची एकूणच पार्श्वभूमी व नियोजन पाहून पोलिसांनाही धक्का बसला. या गुन्ह्यात १४ ते १५ जणांचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यात दोन ते तीन महिलांचा समावेश आहे. यातील केवळ एकावर नागपुरात भादंवि ३२४ कलमान्वये मारहाणीचा गुन्हा तेवढा नोंद आहे. इतरांचे कोणतेही क्राईम रेकॉर्ड मिळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. क्राईम रेकॉर्ड नसताना टेलरिंग, कलरींग, घरकाम, मिस्त्री या सारखे रोजमजुरीचे सामान्य काम करणाऱ्या या टोळीने महिलांच्या सहभागासह दीडशे किलोमीटरवर जाऊन थेट भरदिवसा दरोड्याची योजना आखलीच कशी ? या प्रश्नाने पोलिसांचेही डोके चक्रावले आहे. कोणताही अनुभव नसताना दरोड्यासारखा गुन्हा यशस्वी करणाऱ्या या टोळीच्या या कारनाम्याने गुन्हेगारी वर्तुळात नवख्यांचा गंभीर गुन्ह्यातही सहभाग असू शकतो, ही बाब अधोरेखीत केली आहे. या घटनेमुळे पोलिसांना आता प्रत्येकच गुन्ह्यात नवख्यांचा तर सहभाग नाही ना ही शक्यता तपासून पहावी लागणार आहे. उत्तर प्रदेशातून येऊन गेल्या तीन वर्षांपासून नागपुरात एकटीच राहणारी तरुणी दरोड्याच्या या गुन्ह्याची सूत्रधार आहे, हे विशेष. (कार्यालय प्रतिनिधी)
आरोपींना गंभीर आजारांनी ग्रासले
दरोड्याच्या या गुन्ह्यातील दोघांना एचआयव्ही सारख्या गंभीर आजारांनी ग्रासल्याची धक्कादायक माहितीही वैद्यकीय तपासणीदरम्यान उघड झाली. एचआयव्ही बाधित एक आरोपी अद्याप फरार आहे. तर एका-दोघांना क्षयरोगासारखा आजार असल्याचे सांगितले जाते.
चार आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
दरोड्याच्या या गुन्ह्यात दुसऱ्या टप्प्यात अटक करण्यात आलेल्या महिलेसह चार आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील अटक आरोपींची संख्या १२ वर पोहोचली असून आणखी तीन ते चार जण फरार असल्याचे सांगण्यात येते. सूत्रधार तरुणी आपल्या दोन साथीदारांसह घटनेच्यावेळी यवतमाळात एसटी बसने पोहोचली होती, अशी माहितीही तपासादरम्यान पुढे आली आहे.