अॅट्रॉसिटीला विरोध नाही, गैरवापर टाळावा
By Admin | Updated: September 14, 2016 01:16 IST2016-09-14T01:16:36+5:302016-09-14T01:16:36+5:30
मराठा-कुणबी समाजाचा २५ सप्टेंबर रोजी यवतमाळात मूक क्रांती मोर्चा आयोजित असून त्याच्या तयारीसाठी मंगळवारी येथील संदीप मंगलम्मध्ये पार पडलेल्या

अॅट्रॉसिटीला विरोध नाही, गैरवापर टाळावा
मूक मोर्चा : मराठा-कुणबी बैठकीतील सूर
यवतमाळ : मराठा-कुणबी समाजाचा २५ सप्टेंबर रोजी यवतमाळात मूक क्रांती मोर्चा आयोजित असून त्याच्या तयारीसाठी मंगळवारी येथील संदीप मंगलम्मध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये अॅट्रॉसिटी कायद्याला आमचा विरोध नाही, त्यातील गैरवापर टाळावा एवढीच अपेक्षा असल्याचा सूर यावेळी उमटला.
या बैठकीमध्ये समाजाच्यावतीने अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी मान्यवरांची भाषणेही झाली. समाजाच्या मागण्यांवरही चर्चा झाली. अॅट्रॉसिटी कायद्याला विरोध नसून त्याचा गैरवापर टाळावा, कोपर्डी च्या घटनेतील नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागण्या मूक मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.
या बैठकीत नंदकुमार बुटे, प्रा. संध्या रावते आणि प्रिया गायकवाड आदींनी मोर्चाची भूमिका विशद केली. बैठकीत सर्वप्रथम कोपर्डी घटनेतील मृत श्रध्दाला सामूहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
बैठकीत प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. प्रचार व प्रसाराचे साहित्य वितरित करण्यात आले. प्रत्येकाने मोर्चात सहकुटुंब सहभागी होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
शिवरायाची शिकवण अनुसरूनच मोर्चा काढण्यात येणार आहे. मूक मोर्चा असल्याने कोणीही नारे देऊ नये, कोणीही स्वत: तयार केलेले बॅनर वापरू नयेत, संस्था, संघटनेचे बॅनर वापरता येणार नाही, असे सुध्दा आयोजन समितीने यावेळी स्पष्ट केले.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची प्रत्येकाचे दक्षता घ्यावी, इतकेच नव्हे तर मोर्चानंतर झालेला कचराही स्वत:च साफ करायचा निर्धार यावेळी करण्यात आला. या बैठकीत प्रा. प्रवीण देशमुख यांचे ह्यदयस्पर्शी व्याख्यान झाले. (कार्यालय प्रतिनिधी)
बैठकांचे वेळापत्रक
मोर्चाच्या आयोजनासाठी प्रत्येक तालुक्यात बैठक होणार आहे. १६ सप्टेंबरला महागव, उमरखेड, पुसद, १७ सप्टेंबरला राळेगाव, कळंब, बाभुळगाव, १८ ला मुकुटबन, मारेगाव, वणी, १९ ला नेर, दारव्हा, दिग्रस, २० ला आर्णी, घाटंजी आणि पांढरकवडा येथे बैठक होणार आहे.