शेतकऱ्यांचा अंत पाहू नका
By Admin | Updated: February 29, 2016 02:04 IST2016-02-29T02:04:16+5:302016-02-29T02:04:16+5:30
अधिकारी, कर्मचारी व राज्यकत्यांनी स्वत:ची स्वार्थी प्रवृत्ती बाजुला सारून जनतेचे जीवनमरणाचे प्रश्न सोडवा, ..

शेतकऱ्यांचा अंत पाहू नका
एच.एम. देसरडा : पुसद येथे बळीराजा चेतना अभियानात मार्गदर्शन
पुसद : अधिकारी, कर्मचारी व राज्यकत्यांनी स्वत:ची स्वार्थी प्रवृत्ती बाजुला सारून जनतेचे जीवनमरणाचे प्रश्न सोडवा, अन्यथा आगडोंब उसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलनाचे उपाध्यक्ष, अर्थतज्ज्ञ प्रा.एच.एम. देसरडा यांनी शनिवारी येथे दिला.
येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठन, वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजा चेतना अभियान अंतर्गत ‘सहभाग वाढवा, दुष्काळ हटेल’, ‘शेती, पाणी, रोजगार’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषीभूषण दीपक आसेगावकर होते. कार्यक्रमाला अमरावतीच्या शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, उपविभागीय अधिकारी कैलास वानखेडे, तालुका कृषी अधिकारी पी.एम. राठोड, अॅड. आप्पाराव मैंद, प्राचार्य डॉ. गणेश पाटील उपस्थित होते.
प्रा. देसरडा म्हणाले, विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळ आहे. मात्र अनेकांना शेतकऱ्यांच्या समस्या व दुष्काळाशी कहीही देणे-घेणे नाही. शासनकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे ही दुष्काळी परिस्थिती वाढत आहे. पाऊस एखाद्या वेळी धोका देतो मात्र जनतेला लुबाडणारे अधिकारी, कर्मचारी, नेते, व्यापारी दररोजच धोका देत असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळाचा अभ्यास करताना जवळपास १० वर्र्षे खेडेगावात शेती केली.
त्यामुळे शेती आणि दुष्काळ जवळून अभ्यासता आला. त्याचाच परिणाम म्हणून राज्य आणि देशाच्या विविध कमिट्यावर काम करता आले तर समाजाच्या प्रत्येक घटकाला पाहता आले.
माणूस हा निसर्गाशी वैर करून जगू शकत नाही पण काहींनी निसर्गाशी ऐशीतैशी केली आहे. निसर्ग गरजा पूर्ण करतो पण हाव पूर्ण करत नाही. दुष्काळाच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून पाठपुराव केला होता. आजच्या राजकारण्यांकडे याचा अभाव असून, लोकप्रतिनिधी कुठेच जात नासल्याचे खंत व्यक्त केली. संचालन प्रा. संजय चव्हाण यांनी केले. (प्रतिनिधी)