व्यापारी पद्धतीने शेती केल्यास आत्महत्येची वेळ येणार नाही
By Admin | Updated: June 17, 2017 01:15 IST2017-06-17T01:15:33+5:302017-06-17T01:15:33+5:30
बाजारात काय विकते यानुसार शेतकऱ्यांनी व्यापारी पद्धतीने शेती केल्यास राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही,

व्यापारी पद्धतीने शेती केल्यास आत्महत्येची वेळ येणार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : बाजारात काय विकते यानुसार शेतकऱ्यांनी व्यापारी पद्धतीने शेती केल्यास राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही, असे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड.पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पुसद येथे मराठा जनसंवाद दौऱ्यानिमित्त अॅड.खेडेकर आले असता त्यांनी ‘लोकमत’शी दिलखुलास बातचित केली. शेतकऱ्यांनी शेतीपती होण्यापेक्षा उद्योगपती व्हावे, ही भूमिका मराठा सेवा संघाने मागील २६ वर्षांपासून घेतली आहे. जात्यावर बसले की दळायला येते, याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या पाल्यांना टप्प्याटप्प्याने शेतीपासून दूर करायला हवे. पाल्यांनी आपले पर्याय आपल्या व्यक्तिगत कौशल्यावर निवडले पाहिजे. शेती हा मराठा सेवा संघाला लागलेला फार मोठा फास आहे. जगात कोणीही शेतकरी मोठा झाला नाही. शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलविली पाहिजे. जिवंत राहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे. बाजारात काय विकते, यानुसार शेतकऱ्यांनी शेती करावी, असे त्यांनी सांगितले.
मराठा सेवा संघाच्या उद्दिष्टाबाबत बोलताना अॅड.खेडेकर म्हणाले, १९९० मध्ये मराठा सेवा संघाची स्थापना करण्यात आली. ३३ कक्षांची निर्मिती करून सर्व घटकांना समाविष्ट करण्यात आले. आता मात्र लोककल्याणकारी कार्य करण्याची परंपरा खंडित झाली आहे. जुने, नवे पदाधिकारी यांच्यात वितंडवाद आहे. परिणामी मराठा सेवा संघाचा एकजिनशीपणा अस्ताव्यस्त झाले आहे. पदाधिकारी आपआपल्या पदांना न्याय देण्यास असमर्थ ठरत आहे. यामुळे संवाद व संपर्क तुटला आहे. तो पुनर्स्थापित करणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने आपण व आपले काही निवडक सहकारी पुन्हा एकदा मराठा सेवा संघाची पुनर्बांधणी करण्याच्या हेतूने घराबाहेर पडलो असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत साशंकता
मराठा आरक्षणाबाबत बोलताना अॅड.खेडेकर म्हणाले, मराठा समाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश असावा, ही मराठा सेवा संघाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ इच्छिते. आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबत साशंकता असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रा.अर्जुन तनपुरे, डॉ.दिलीप महाले, दिगंबर जगताप, प्रकाश पानपट्टे, नितीन पवार, प्रवीण कदम, प्रकाश बेद्रे, यशवंत चौधरी, प्रभाकर टेटर आदी उपस्थित होते.