पक्ष सोडणाऱ्यांना थारा देऊ नका
By Admin | Updated: June 23, 2014 00:21 IST2014-06-23T00:21:13+5:302014-06-23T00:21:13+5:30
पक्ष सोडून गेलेले नेते व कार्यकर्त्यांना पक्षात पुन्हा थारा देऊ नका. दिल्यास त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीवर होईल, असा धमकीवजा इशारा येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांनी दिला.

पक्ष सोडणाऱ्यांना थारा देऊ नका
कार्यकर्त्यांचा सूर : घाटंजीत काँग्रेसची चिंतन बैठक
सुधाकर अक्कलवार - घाटंजी
पक्ष सोडून गेलेले नेते व कार्यकर्त्यांना पक्षात पुन्हा थारा देऊ नका. दिल्यास त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीवर होईल, असा धमकीवजा इशारा येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांनी दिला. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांच्या अध्यक्षतेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनात ही बैठक झाली.
लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला, त्यासाठी जबाबदार कोण, यावर या बैठकीत मंथन झाले. शिवाय कार्यकर्ते आणि पदाधिकारीही चार्ज व्हावे यासाठी मार्गदर्शन झाले. तालुका आणि परिसरातील या मंडळींना बैठकीसाठी बोलाविले होते. पक्षातील उणिवा यावेळी उजागर करण्यात आल्या. होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती होवू नये यासाठी सजगता म्हणून काय दक्षता घेतल्या जाव्या याविषयी चिंतन करण्यात आले. नेत्यांनी आपल्या भाषणातून या सर्व टीप्स दिल्या. मात्र काही कार्यकर्त्यांनी दलबदलूंविषयी आपली नाराजी बिनधास्त मांडली. तालुक्यातील काही नेते पक्ष सोडून गेले हाते. ते पुन्हा काँग्रेसवासी होणार अशी चर्चा कानावर आल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले. या पक्ष सोडणाऱ्यांना पक्षात पुन्हा थारा देवू नका, अशी धमकीवजा विनंती यावेळी काहींनी केली. यावर पक्ष नेमकी काय भूमिका घेतो याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्यापुढे कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. बाहेर पडलेल्या लोकांना पुन्हा पक्षात घेतल्यास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा गट नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ना. मोघे नेमके कोणते पाऊल उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. घाटंजी तालुक्यातील अनेक संस्थांवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. या संस्थांवरील पदाधिकाऱ्यांची नाराजी येवू नये यासाठीही सावध भूमिका घेतली जाणार आहे. बैठकीला पंचायत समिती सभापती रूपेश कल्यमवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शैलेश इंगोले, इकलाख खान पटेल, किशोर दावडा, महादेव राठोड, सैयद रफिक आदी उपस्थित होते.