दिवाळीला घरी कापसाचे बोंडही नाही

By Admin | Updated: October 22, 2014 23:25 IST2014-10-22T23:25:38+5:302014-10-22T23:25:38+5:30

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून यंदा तर दिवाळीच्या दिवशीही शेतकऱ्यांच्या घरी कापसाचे बोंड आले नाही. दरवर्षी दसऱ्यातच शेतकऱ्यांच्या घरी कापूस येतो. या कापसावरच

Diwali does not have a cotton bamboo at home | दिवाळीला घरी कापसाचे बोंडही नाही

दिवाळीला घरी कापसाचे बोंडही नाही

पुसद : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून यंदा तर दिवाळीच्या दिवशीही शेतकऱ्यांच्या घरी कापसाचे बोंड आले नाही. दरवर्षी दसऱ्यातच शेतकऱ्यांच्या घरी कापूस येतो. या कापसावरच दिवाळी साजरी केली जाते. मात्र यंदा शेतकऱ्यांच्या घरी कापूस न आल्याने दिवाळी अंधारात साजरी करावी लागत आहे.
दिवाळी हा प्रकाशाचा सण सर्वच जण उत्साहात साजरा करतात. आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करतात. कपडेलत्त्यापासून तर घराचे रंगरंगोटीपर्यंत कामे केली जातात. नोकरदार कर्मचाऱ्यांची दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत असताना शेतकरी मात्र हतबल दिसत आहे. तालुक्यात यावर्षी सुरुवातीपासूनच अत्यल्प पाऊस झाला. पावसाचे सुरुवातीचे नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे पेरणी उशिरा झाली. त्यानंतर जेमतेम पावसात पेरणी आटपावी लागली. त्यानंतर पावसाने दीड महिना दडी मारली. याचा परिणाम पिकांवर झाला. उडीद, मूग उद्ध्वस्त झाले. सोयाबीन, तूर, ज्वारी, कपाशीची वाढ खुंटली. सोयाबीन फुलोऱ्यावर आले. त्यावेळेस किडींनी आक्रमण केले. मोझॅक रोगाने पाने पिवळी पडून सोयाबीन उद्ध्वस्त झाले. दरवर्षी १००-१०० पोते सोयाबीन होणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात यावर्षी दहा पोतेही सोयाबीन आले नाही. सोयाबीन काढणीलाही परवडत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. सोयाबीन पोत्याने नव्हे तर किलोने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सोयाबीन प्रमाणेच कपाशीचीही स्थिती आहे. दिवाळीपूर्वी कापूस शेतकऱ्यांच्या घरी येतो. नव्या कापसाची वात दिवाळीतील दिव्यांसाठी वापरली जाते. घरी आलेला कापूस विकून दिवाळी आनंदात साजरी केली जाते. परंतु यंदा कापसाचे बोंडही घरी आले नाही. अपरिपक्व बोंडे फुटत आहे. पणननेही अद्याप कापूस खरेदीचा शुभारंभ केला नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात आहे.
पुसदच्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी दिसत असली तरी त्यात शेतकरी अत्यल्प आहे. खरेदी करणारे शेतकरी हातचे राखून खरेदी करताना दिसत आहे. उधार-उसने करून मुलाबाळांसाठी नवीन कपडे घेण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक कार्यकर्त्यांनी दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Diwali does not have a cotton bamboo at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.