‘दिव्यांगां’चे फुटणार बिंग
By Admin | Updated: June 19, 2017 00:45 IST2017-06-19T00:45:36+5:302017-06-19T00:45:36+5:30
काही शिक्षकांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून बदलीत सूट मिळविली. आता अशा शिक्षकांची नागपूर येथे तपासणी केली जाणार असून

‘दिव्यांगां’चे फुटणार बिंग
नागपूरला तपासणी : शहरालगतच्या शाळांवर शिक्षकांचा जादा भरणा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : काही शिक्षकांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून बदलीत सूट मिळविली. आता अशा शिक्षकांची नागपूर येथे तपासणी केली जाणार असून त्यात अपंगत्व न आढळल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्याची हालचाल जिल्हा परिषदेने सुरू केल्याने अनेकांचे बिंग फुटण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेचा सर्वात मोठा विभाग म्हणून शिक्षण विभगाची ओळख आहे. याच विभागांतर्गत सर्वाधिक शिक्षक कार्यरत आहे. एकाच पंचायत समितीत किमान १० वर्षे झालेल्या शिक्षकाची बदली करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याला अनुसरून दरवर्षी बदली प्रक्रिया राबविली जाते. या बदलीत अपंग कर्मचाऱ्यांना सूट दिली जाते. त्यामुळे यवतमाळसारख्या शहरात वास्तव्याला असलेले अनेक शिक्षक इतर पंचायत समितीत जाण्याचे टाळतात. त्यासाठी विविध पर्याय ते वापरतात. त्यातूनच गेल्या तीन वर्षांपूर्वी बोगस अपंग शिक्षकांचे प्रकरण उजेडात आले.
काही शिक्षकांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून या बदलीत सूट मिळविली. २०१३-१४ मध्ये तब्बल १०४ जणांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून बदलीतून सुटका करवून घेतली. ४० टक्केपेक्षा जादा अपंगत्व असल्यास त्यांना बदलीत सूट दिली जाते. नेमकी हीच बाब हेरून अनेकांनी तसे प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले, असे आरोप होत आहे. या अपंगत्व प्रमाणपत्राचे दर तीन वर्षांनी नूतनीकरण करावे लागते. अनेक शिक्षकांनी ते नूतनीकरण करून गेल्या तीन वर्षांपासून बदलीतून सूट मिळविल्याचेही उजेडात येत आहे.
शिक्षकांना मिळालेले प्रमाणपत्र खरच बोगस आहे का, याचा आता शोध घेतला जात आहे. त्यासाठी त्यांना नागपूर येथे पाठवून तपासणी करण्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक सिंगला यांनी दिली. या तपासणीत बोगस अपंगांचा भंडाफोड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात काही शिक्षक संघटनांचे पदाधिकारीही अडकण्याची शक्यता आहे. काही शिक्षकांनी या प्रमाणपत्राचा आधार घेत पत्नीला बदलीतून सूट मिळवून घेतली आहे.
सर्व शिक्षक अपंग असतील, तर शाळेचे काय ?
शहरालगतच्या लोहारा शाळेत बहुतांश शिक्षक अपंग असल्याचे उघड झाले. एकाच शाळेवरील सर्व शिक्षक अपंग असेल, तर त्या शाळेचे काय होणार, असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला आहे. नेर तालुक्यातील एका शाळेवरील अपंग शिक्षक उशिरा येतात अन् लवकर जातात. त्यांना काही म्हटले, तर ते चक्क आपण अपंग असल्याचे सांगून पालकांनाच धमकावतात, असे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे यांनी हा प्रकार गंभीर असून शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांना संबंधित शाळेला भेट देऊन चौकशी करण्याचे आदेश दिले.