१० दिवसात सव्वाशे कोटी निधी खर्च करण्याचे दिव्य
By Admin | Updated: March 22, 2015 01:59 IST2015-03-22T01:59:52+5:302015-03-22T01:59:52+5:30
जिल्हा नियोजन समितीने आर्थिक वर्ष संपण्याच्या एक महिनाआधी निधी दिल्याने आता अवघ्या दहा दिवसात सव्वाशे कोटी रुपये खर्च...

१० दिवसात सव्वाशे कोटी निधी खर्च करण्याचे दिव्य
यवतमाळ : जिल्हा नियोजन समितीने आर्थिक वर्ष संपण्याच्या एक महिनाआधी निधी दिल्याने आता अवघ्या दहा दिवसात सव्वाशे कोटी रुपये खर्च करण्याचे दिव्य एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला करावे लागणार आहे. त्यातच पांढरकवडाचा कारभार प्रभारावर असल्याने निधी खर्चाला मर्यादा येत आहे.
जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्यावतीने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. पुसद आणि पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून हा निधी खर्च केला जातो. यावर्षी आदिवासी विकास विभागासाठी १५३ कोटी ८७ लाख रुपयांचे नियोजन करण्यात आले होते. सुरूवातीला ६० टक्के निधी आदिवासी योजनांच्या अंमलबजावणीसाठी देण्यात आला. मात्र पांढरकवडा येथील कारभार प्रभारावर असल्याने हा निधी पाहिजे त्या प्रमाणात खर्चच झाला नाही. तर उर्वरित ४० टक्के निधी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाठविण्यात आला. हा निधी येताच अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. केवळ दहा दिवसात सव्वाशे कोटी रुपये कसे खर्च करावे असा प्रश्न आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. एकीकडे आदिवासी विकासाच्या योजना रखडल्या.
लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचल्याच नाही. आता हा निधी खर्च करण्याचे दिव्य पार पाडावे लागणार आहे. प्रकल्प कार्यालयात नियोजन अधिकारी सांख्यिकी सहायक आणि नियोजन सहायक ही महत्त्वाची पदे आणि प्रकल्प अधिकाऱ्याचेही पदही रिक्त आहे. (शहर वार्ताहर)