जिल्हा कारागृह ‘हाऊसफुल्ल’

By Admin | Updated: April 4, 2015 01:29 IST2015-04-04T01:29:18+5:302015-04-04T01:29:18+5:30

नागपूर मध्यवर्ती कारागृहासारखेच यवतमाळ जिल्हा कारागृहही हाऊसफुल्ल झाले आहे. २२९ कैदी क्षमता

District prison 'housefool' | जिल्हा कारागृह ‘हाऊसफुल्ल’

जिल्हा कारागृह ‘हाऊसफुल्ल’

नागपूरच्या घटनेनंतर खबरदारीच्या सूचना : क्षमता २२९ ची, बराकीत तब्बल ४३५ कैदी
यवतमाळ :
नागपूर मध्यवर्ती कारागृहासारखेच यवतमाळ जिल्हा कारागृहही हाऊसफुल्ल झाले आहे. २२९ कैदी क्षमता असताना येथे तब्बल ४३५ कैदी ठेवले गेले आहेत. त्यामुळेच अपर महासंचालकांनी खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा कारागृह प्रशासनाला दिले आहे.
राज्यात सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच कैदी पळून गेल्याने एकूणच कारागृहांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपुरात तडकाफडकी अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले गेले. अनेकांची चौकशी सुरू आहे. खुद्द अपर पोलीस महासंचालक (कारागृह) मीरा बोरवनकर नागपुरात ठाण मांडून आहेत. नागपूरच्या या घटनेने राज्यातील सर्वच कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागपूरच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व कारागृहांना सतर्कतेचे आदेश दिले गेले आहेत. सुरक्षेच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना मीरा बोरवनकर यांनी केल्या आहे. त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्हा कारागृहात सुरक्षेच्या उपाययोजनांचा नव्याने आढावा घेतला गेला आहे. त्या अंती यवतमाळ जिल्हा कारागृह सुरक्षित असल्याचा दावा येथील प्रशासनाने केला आहे.
यवतमाळ जिल्हा कारागृहातील कैदी क्षमता २२९ एवढी आहे. मात्र प्रत्यक्षात तेथे क्षमतेच्या दुप्पट अर्थात तब्बल ४३५ कैदी-बंद्यांना ठेवण्यात आले आहे. येथे पाचच महिलांना ठेवण्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात नऊ महिला कारागृहात आहेत. गर्दी वाढल्याने जिल्हा कारागृहातील बराकी हाऊसफुल्ल झाल्या आहेत. दुप्पट कैदी असल्याने अंतर्गत व्यवस्था सांभाळताना कारागृह प्रशासन व यंत्रणेवर ताण पडतो आहे. अंतर्गत व्यवस्थाही कोलमडण्याची भीती राहते. मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार सोयीसुविधा वेळेत पुरविताना अडचणी निर्माण होतात. मात्र त्यावर मात करून जिल्हा कारागृहात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जात आहे. येथे अधीक्षकासह कर्मचाऱ्यांच्या १० ते १५ जागा रिक्त आहेत. लिपिकवर्गीय यंत्रणाही पुरेशी नसल्याने शिपायांकडून कामे करून घ्यावी लागत आहेत. येथील रुग्णालयात वैद्यकीय अधिकारीही प्रभारी आहेत. कारागृहाच्या प्रवेशद्वारावर किमान दोन ते तीन शिपाई तैनात करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात एकावर काम चालवावे लागत आहे. अशाही परिस्थितीत जिल्हा कारागृह एकदम सुरक्षित मानले जात असून येथून आतील व्यवस्था तोडून पळून जाण्याचा कोणी विचारही करू शकणार नाही, असा दावा कारागृह प्रशासनाकडून केला जात आहे.
यवतमाळ जिल्हा कारागृहात पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेतीलच आरोपींना ठेवले जाते. कारागृहात असलेल्या ४३५ जणांमध्ये बहुतांश न्यायाधीन बंदी आहेत. यवतमाळ शहरात संघटित गुन्हेगारीचे नेटवर्क बरेच मोठे आहे. अनेकदा दोन्ही परस्परविरोधी टोळ्यांचे सदस्य एकाचवेळी कारागृहात येण्याचा प्रसंगही उद्भवतो. अशावेळी दोन गटांना दोन वेगवेगळ्या बराकीत ठेवून व त्यांचा बाहेर निघण्याचा वेळ बदलवून खबरदारी घेतली जाते. अनेकदा सुरक्षेच्या कारणावरून अशा टोळ्यांच्या म्होरक्यांना अमरावती मध्यवर्ती कारागृहात हलविण्याची उपाययोजनाही केली जाते. गुन्हेगारी टोळीच्या बड्या म्होरक्यांचा भर हा यवतमाळ कारागृहातच राहण्यावर अधिक असतो. कारण येथल्या येथे नातेवाई, मित्र व आपल्या टोळीतील सदस्यांशी सहज भेटीगाठी होतात. तत्काळ संदेश पोहोचविले जावू शकतात.
यवतमाळ जिल्हा कारागृहाची भिंत उत्तूंग असली तरी त्यावरूनही क्रिकेटचा बॉलद्वारे गांजा, अफिमसारखे अंमली पदार्थ पोहोचविण्याचे पराक्रम होतात. अलीकडेच हा पराक्रम कारागृहातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने उघड झाला. गेल्या महिन्यात अपर पोलीस महासंचालक (कारागृह) मीरा बोरवनकर यांनी जिल्हा कारागृहाला प्रत्यक्ष भेट देवून सुरक्षेचा आढावा घेतला होता. या कारागृहात मोबाईल जामर लावले आहेत. खुद्द बोरवनकर यांनी या जामरची ट्रायल घेतली असता ते नादुरुस्त असल्याची पोलखोल झाली होती. (जिल्हा प्रतिनिधी)

न्यायाधीन बंद्यांची तारखेवरील मार्गात ‘रेलचेल’

न्यायप्रविष्ट खटल्यांमध्ये जामीन न झालेल्या आरोपींना न्यायाधीन बंदी म्हणून जिल्हा कारागृहात ठेवले जाते. कारागृहात हे बंदी खास सोयी सुविधांपासून वंचित राहतात. म्हणून त्यांचा जोर हा तारखेवर जाण्यावर अधिक असतो. कारण तारखेवर जाताना आणि तेथून परत येईपर्यंत या न्यायाधीन बंद्यांची खानपानाची रेलचेल असते. तारखेवर येणार म्हणून नातेवाईक जेवणाचे डबे, पैसे घेऊन न्यायालयाच्या आवारात उपस्थित असतात. कारागृहाबाहेर निघाल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस त्यांना सहृदयता म्हणून नातेवाईकांशी मोबाईलवर बोलण्याची, बीडी-काडीचा शौक पूर्ण करण्याची मूकसंमती देतात. त्यामुळेच या न्यायाधीन बंद्यांना नेहमीच ‘पुढील तारखेचे’ वेध लागलेले असतात. अनेकदा या आरोपींना वेळीच पोलीस गार्ड उपलब्ध न झाल्याने ठरलेल्या तारखेवर नेणे शक्य होत नाही. अशावेळी त्यांचा हिरमोड होतो. म्हणून आपल्याला तारखेवर नेण्यासाठी ठरलेल्या दिवशी पोलीस गार्ड उपलब्ध व्हावी म्हणून ते आपल्यास्तरावरच आधीच ‘सेटींग’ करीत असल्याची माहिती आहे.

Web Title: District prison 'housefool'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.