राष्ट्रीयकृत बँकांना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले

By Admin | Updated: March 30, 2015 02:04 IST2015-03-30T02:04:27+5:302015-03-30T02:04:27+5:30

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत असल्याचा नेहमीचा अनुभव आहे.

District officials reprimanded nationalized banks | राष्ट्रीयकृत बँकांना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले

राष्ट्रीयकृत बँकांना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले

यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत असल्याचा नेहमीचा अनुभव आहे. यावर्षीही राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ४७ टक्केच कर्ज वितरण केले. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडे धाव घ्यावी लागली. हा प्रकार भविष्यात घडू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवस्थापकांना चांगलेच फटकारल्याची माहिती आहे.
जिल्हा बँकेसोबतच राष्ट्रीयकृत बँकांनाही पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले जाते. यावर्षी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना ८८० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होेते. मात्र या बॅँकांनी केवळ ४१० कोटी रुपयांचेच कर्ज वितरित केले. उद्दिष्टाच्या तुलनेत हे कर्ज वाटप केवळ ४७ टक्क्याच्या घरात आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पीक कर्ज महत्वाचे असते. यावरच शेतीचा डोल्हारा अवलंबून असतो. यानंतरही राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यासाठी टाळाटाळ करतात. शेतकऱ्यांना कर्ज वितरित केल्यानंतर ते परतफेड करणार की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येते. गत काही वर्षाचा हा अनुभव आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आगामी पीक कर्ज वाटपासंदर्भात बँकेच्या व्यवस्थापकांची बैठक घेतली. या बैठकीत कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांना चांगलेच फटकारल्याची माहिती आहे. तसेच दुष्काळी मदत वाटपाच्या यादीत नाव नसल्याचे कारण पुढे करीत अनेकांना मदत मिळाली नाही. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापकांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. (शहर वार्ताहर)

Web Title: District officials reprimanded nationalized banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.