तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जिल्ह्याला १९ लाख डोस हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 05:00 IST2021-07-24T05:00:00+5:302021-07-24T05:00:12+5:30
आरोग्य विभागाने लसीकरणासाठी २६७ केंद्रांची निर्मिती केली आहे. या केंद्राची दर दिवसाची क्षमता ५० हजार नागरिकांना लसीकरण करता येईल, इतकी मोठी आहे. त्या क्षमतेनुसार आतापर्यंत फक्त एकच वेळा ५५ हजार लस जिल्ह्याला मिळाली. त्यात एकाच दिवशी ४३ हजार लसीकरण करण्यात आले. त्यावेळी जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिला. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात आता लस येत नाही.

तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जिल्ह्याला १९ लाख डोस हवे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पंतप्रधानापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत प्रत्येक जण सांगत आहे. जाणीव जागृती केली जात आहे. कोरोनाला रोखणारे हत्यार म्हणजे लसीकरणच आहे. यासाठी लसीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे, असे असतानाही लस उपलब्ध होण्याचे प्रमाण मात्र नगण्य आहे. केंद्र आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या निकषानुसार असणाऱ्या वयोगटाला १९ लाख डोसची नितांत आवश्यकता आहे. मात्र, डोस उपलब्ध होणे अवघड झाले आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांपुढे पेच निर्माण झाला आहे.
ऑगस्ट अथवा पुढील काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट पसरण्याचा धोका आरोग्य विभागाने वर्तविला आहे. तत्पूर्वी हे संपूर्ण लसीकरण होणे आवश्यक आहे. त्याकरिता विविध कंपन्यांच्या लस बाजारात येणार असल्याचा कार्यक्रमही जाहीर झाला होता. मात्र, अजून तरी कोरोनाच्या लस पाहिजे त्या प्रमाणात बाहेर आल्याच नाहीत. यामुळे अडचणीत वाढ झाली आहे. आरोग्य विभागाला मिळणारी लस लोकसंखेच्या प्रमाणात जिल्ह्यांना वितरित होत आहे. यात किती लस मिळेल, हे सांगणे अवघड आहे.
आरोग्य विभागाने लसीकरणासाठी २६७ केंद्रांची निर्मिती केली आहे. या केंद्राची दर दिवसाची क्षमता ५० हजार नागरिकांना लसीकरण करता येईल, इतकी मोठी आहे. त्या क्षमतेनुसार आतापर्यंत फक्त एकच वेळा ५५ हजार लस जिल्ह्याला मिळाली. त्यात एकाच दिवशी ४३ हजार लसीकरण करण्यात आले. त्यावेळी जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिला. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात आता लस येत नाही. आठ दिवसाला २० ते ३० हजार लस येत आहेत. गत सात महिन्यांत जिल्ह्यात सात लाख २५ हजार ८१८ डोस उपलब्ध झाले आहेत. प्रारंभी मे ते जूनमध्ये १८ ते ४४ वयोगटांतील २३ हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले. आता १८ ते ४४ वयोगटांत एक लाख ४२ हजार १५ नागरिकांना पहिला डोस मिळाला, तर १० हजार ७०५ नागरिकांना दुसरा डोस घेतला.
गरोदर मातांसाठी कॅम्पेनिंग
- ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातून गरोदर मातांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्याकरिता आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, याशिवाय स्तनदा मातांना कोरोनाची लस दिली जात आहे.
लसीकरणात सर्वच प्रवर्गातील नागरिक पुढे येत आहेत. गरोदर मातांच्या लसीकरणाला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातून ही लस दिली जाणार आहे. गरोदर महिलासाठी ही लस सुरक्षित आहे. - डॉ.सुहास कोरे,
लसीकरण विभाग प्रमुख
लसीकरणात तृतीय पंथीयांचा समावेश
- जिल्ह्यात इतर प्रवर्गाच्या लसीकरणात २७० नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये काही तृतीयपंथीयांनी लसीकरण पूर्ण केले आहे. सर्वांसाठी लसीकरण खुले करण्यात आले आहे. त्याचा लाभ होत आहे.