जिल्ह्यात १० हजार मोलकरणींची नोंद
By Admin | Updated: October 20, 2016 01:42 IST2016-10-20T01:42:00+5:302016-10-20T01:42:00+5:30
जिल्ह्यात तब्बल १० हजार मोलकरणी असल्याचे कामगार कल्याण कार्यालयातील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात १० हजार मोलकरणींची नोंद
यवतमाळ : जिल्ह्यात तब्बल १० हजार मोलकरणी असल्याचे कामगार कल्याण कार्यालयातील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. बुधवारी नोंदणीसाठी आलेल्या मोलकरणींना मात्र नोंदीसाठी एकच टेबल असल्याने निराश होऊन परतावे लागले.
दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी कामगार कल्याण कार्यालयात घरेलू मोलकरणींची नोंद केली जाते. आज तिसरा बुधवार असल्याने कामगार कल्याण कार्यालयात नोंद करण्यासाठी मोलकरणींनी एकच गर्दी केली होती. मात्र नोंदीसाठी एकच टेबल असल्याने मर्यादित वेळेत अल्प नोंदी झाल्या. परिणामी शेकडो मोलकरीण आणि घरेलू कामगार महिलांना रिकाम्या हाताने परतावे लागले. राज्य शासनाने घरेलू मोलकरणींकरिता १० हजार रूपयांच्या अनुदानाची योजना जाहीर केली होती. २०१४ पर्यंत ज्या महिलांचे वय ५५ ते ६० वर्षे आहे, अशांना हे अनुदान वितरित करण्यात येत आहे. त्यानंतरच्या नोंदी असलेल्या घरेलू मोलकरणी महिलांसाठीही प्रसूती अनुदानाची योजना आहे. याशिवाय इतरही शासकीय योजनासाठी ही नोंद महत्त्वाची ठरणार आहे.
यामुळे जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या महिलांनी बुधवारी सकाळपासून कार्यालयात गर्दी केली होती. मात्र नोंदीसाठी एकच टेबल असल्याने अनेक महिलांना नोंद न करता परतावे लागले. नोंदणीचे दिवस वाढवावे आणि तालुकास्तरावर नोंदणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी महिलांनी केली आहे.
(शहर वार्ताहर)