पुसदमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पायदळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 05:00 IST2020-07-16T05:00:00+5:302020-07-16T05:00:07+5:30
महात्मा फुले चौकात बुधवारी सकाळी ८ वाजताच दुकाने उघडली. नागरिक बाजारपेठेत बिनधास्त वागत होते. यामुळे प्रशासनाचा वचक संपल्याचे दिसून आले. सुभाष चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक आदी परिसरात नागरिक बिनधास्त वावरत होते. दुचाकीवरून डबल सीट फिरतानाही अनेकजण आढळले. ऑटोरिक्षाही बिनधास्त धावत होत्या.

पुसदमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पायदळी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारपासून सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची घोषणा केली. मात्र पहिल्याच दिवशी पुसदमध्ये दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केली. सकाळी ८ वाजता दुकाने उघडण्यात आली.
पुसद शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे १५ ते २१ जुलैपर्यंत उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी यापूर्वीच लॉकडाऊन घोषित केला होता. तथापि पालकमंत्र्यांनी यवतमाळात झालेल्या बैठकीत केवळ पुसदमध्येच लॉकडाऊन का, उर्वरित जिल्ह्यात लॉकडाऊन का नाही असा प्रश्न उपस्थित केला. संपूर्ण जिल्ह्यात एकच नियमावली लागू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारपासून सकाळी १० ते दुपारी २ वाजतापर्यंत सर्व प्रतिष्ठाने सुरू ठेवण्याचा निर्णय घोषित केला. त्याला पहिल्याच दिवशी येथे हरताळ फासण्यात आला.
महात्मा फुले चौकात बुधवारी सकाळी ८ वाजताच दुकाने उघडली. नागरिक बाजारपेठेत बिनधास्त वागत होते. यामुळे प्रशासनाचा वचक संपल्याचे दिसून आले. सुभाष चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक आदी परिसरात नागरिक बिनधास्त वावरत होते. दुचाकीवरून डबल सीट फिरतानाही अनेकजण आढळले. ऑटोरिक्षाही बिनधास्त धावत होत्या. प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करीत आहे.
२९ नागरिक डीसीएचसी सेंटरमध्ये क्वारंटाईन
एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४५ वर पोहोचली. त्यापैकी २३ जण अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह, तर १४ जण कोरोनामुक्त झाले. एकाचा मृत्यू झाला. रुग्णांमध्ये शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर, परिचारिका, व्यावसायिक आदींचा समावेश आहे. शेंबाळपिंपरी, संभाजीनगर, अरुण ले-आऊट, गढी वॉर्ड व दिग्रसचे २९ नागरिक डीसीएचसी सेंटरमध्ये क्वारंटाईन आहे.