जिल्हाधिकाऱ्यांनी दिली पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे
By Admin | Updated: December 9, 2014 22:58 IST2014-12-09T22:58:00+5:302014-12-09T22:58:00+5:30
पेपरफूट प्रकरणाच्या तपासात औरंगाबाद पोलिसांनी चौकशीचा भाग म्हणून जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना एक प्रश्नावली दिली होती. त्यातील प्रश्नांची जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे घेऊन

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे
यवतमाळ : पेपरफूट प्रकरणाच्या तपासात औरंगाबाद पोलिसांनी चौकशीचा भाग म्हणून जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना एक प्रश्नावली दिली होती. त्यातील प्रश्नांची जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे घेऊन मंगळवारी पथक औरंगाबादकडे रवाना झाले.
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या नोकरभरती प्रक्रियेत पेपरफुटीची घटना घडली. त्यामध्ये औरंगाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने एका सहायक विक्रीकर निरीक्षकासह ११ जणांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून प्रश्नपत्रिकाही जप्त करण्यात आली होती. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने आणि पेपरफुटीच्या प्रकरणासंदर्भात लक्षवेधी उपस्थित झाली आहे. त्यामुळे हा विषय अधिवेशनात चर्चेला येण्याची दाट शक्यता आहे. वेळेअभावी तसे नाही झाले तरी त्याची यथोचित माहिती लक्षवेधी उपस्थित करणाऱ्या लोकप्रतिनिधींना द्यावी लागते. त्याचाच एक भाग म्हणून पेपरफूट प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. अटकेतील ११ जणांची कसून चौकशी करण्यात आली. घटनेचा मुख्य सूत्रधार सहायक विक्रीकर निरीक्षक खामनकर हा पेपर फोडणाऱ्या व्यक्तीचे नाव सांगायला तयार नाही. त्यामुळे त्याची नार्को टेस्ट करण्यासाठी पोलिसांनी तयारी चालविली आहे. शिवाय भरती प्रक्रिया राबविणाऱ्या जिल्हा निवड समितीतील पदाधिकाऱ्यांचा तर यात सहभाग नाही ना या दृष्टीनेही बारकाईने चौकशी केली जात आहे. त्यामुळेच पुन्हा हा तपास यवतमाळवर केंद्रित करण्यात आला.
औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह यांची या प्रकरणाच्या तपासावर बारिक नजर आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या नेतृत्वातील एक पथक सोमवारी यवतमाळात पाठविले. यावेळी या पथकाने जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल आणि जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी यांची चौकशी केली. त्यानंतर दोघांनाही एक प्रश्नावली देण्यात आली. तसेच या प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरूपात मागितली. प्रभारी सीईओ कुळकर्णी यांनी सोमवारीच ही माहिती औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन केली. मात्र जिल्हाधिकारी महिवाल यांनी ही माहिती मंगळवारी देण्याचे सांगितले होते. त्यामुळे पथक येथेच थांबून राहिले. मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी महिवाल यांनी ती माहिती औरंगाबाद पोलिसांना दिली. त्यानंतर पथक येथून औरंगाबादकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसातून देण्यात आली.
औरंगाबाद पोलिसांनी पेपरफुटीच्या तपासाला वेग दिला असला तरी अद्याप पेपर फोडणाऱ्याचे नाव पुढे आले नाही. त्यामुळे जनसामान्यांमध्ये त्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)