जिल्हा बँक कर्मचारी संघटनेत फुटीचा डाव

By Admin | Updated: August 22, 2015 02:33 IST2015-08-22T02:33:26+5:302015-08-22T02:33:26+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक लाभातून सोडविले जाणारे संचालकांच्या ‘मार्जीन मनी’चे गणित डोळ््यापुढे ठेऊन या कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव रचला जात आहे.

District Bank Employees Association | जिल्हा बँक कर्मचारी संघटनेत फुटीचा डाव

जिल्हा बँक कर्मचारी संघटनेत फुटीचा डाव

पतसंस्थेचे अध्यक्षपद : वेतनवाढ, बोनसमधील ‘मार्जीन मनी’चे गणित
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक लाभातून सोडविले जाणारे संचालकांच्या ‘मार्जीन मनी’चे गणित डोळ््यापुढे ठेऊन या कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव रचला जात आहे.
जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा भत्ते, वेतनवाढ, बोनस असे लाभ दिले जातात. हे लाभ जुन्या तारखेत लागू केले जातात. मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या हाती चालू तारखेपासूनचे लाभ देऊन जुन्या तारखेचे लाभार्थी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळातील अनेक सदस्य होतात असाच आजपर्यंतचा अलिकडच्या काळातील बहुतांश अनुभव आहे. कर्मचाऱ्यांच्या लाभातील ‘मार्जीन मनी’चा वाटा मिळावा म्हणून हे कर्मचारी एकत्र येऊ नये, त्यांच्यात कायम फूट रहावी, असा प्रयत्न संचालकांकडून केला जातो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक २०० कोटी रुपयांची उलाढाल आहे. या पतसंस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे कर्मचारी पुन्हा एकजूट होण्याची शक्यता आहे. ते पाहून काही संचालकांना जणू हूरहूर लागली आहे. हे कर्मचारी एकत्र आल्यास आपल्या ‘मार्जीन मनी’चे कसे याची चिंता या संचालकांना भेडसावते आहे. म्हणूनच त्यांनी हे कर्मचारी एकत्र येणार नाही, या दृष्टीने प्रयत्न चालविले आहे.
बँकेच्या कर्मचारी पतसंस्थेच्या १५ संचालक पदासाठी निवडणूक झाली. त्यातील एक संचालक अविरोध निवडून आले. या संचालकासह नऊ जागा सहकार पॅनलने तर सहा जागा सहयोग पॅनलने पटकाविल्या. या पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. त्याचा कार्यक्रम जारी होण्याची प्रतीक्षा आहे. आॅगस्ट अखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे. संचालकांच्या निवडीत एकमेकांच्या विरोधात लढलेले कर्मचाऱ्यांचे पॅनल एकत्र येऊन सर्वसंमतीने अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडण्याच्या मानसिकतेत आला आहे. मात्र ही एकजूट होऊ नये म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळातून सूत्रे हलविली जात असल्याची माहिती आहे. त्यामागे ‘मार्जीन मनी’ हा छुपा स्वार्थ आहे. कर्मचारी भांडत रहावे, त्यांच्या दोन संघटना सक्रिय रहाव्या, असा प्रयत्न आहे. एकजूट झाल्यास ते संचालकांच्या विरोधात जाण्याची भीती आहे. म्हणूनच त्यांच्यात भांडणे व दोन गट राहिल्यास कोणत्याही एका गटाला जवळ घेऊन आपला स्वार्थ साधता येईल, असा जिल्हा बँक संचालकांचा मनसुबा आहे. या पतसंस्थेच्या अध्यक्षपदासाठी दोनही पॅनलकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. जिल्हा बँकेच्या एका संचालकानेसुद्धा आपल्या नातेवाईकाच्या गळ्यात पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची माळ घालता येते का या दृष्टीने चाचपणी चालविली आहे.
पतसंस्थेच्या एका पॅनलचे प्रमुख जिल्हा बँक अध्यक्षांच्या मर्जीतील असल्याचे बोलले जाते. विशेष असे पॅनलच्या या प्रमुखांना तांत्रिक ज्ञान असले तरी पतसंस्थेच्या मतदार यादीत त्यांचे नाव नाही. त्यांना हाताशी धरुनच जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न संचालक स्तरावरून केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: District Bank Employees Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.