पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण
By Admin | Updated: May 2, 2015 02:01 IST2015-05-02T02:01:02+5:302015-05-02T02:01:02+5:30
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त पोस्टल मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण ...

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त पोस्टल मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभाप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या मान्यवरांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अपर पोलीस अधिक्षक तथा जिल्हा होमगार्ड समादेशक जे.बी.डाखोरे आदी उपस्थित होते. फेब्रुवारी महिन्यात उमरखेड तालुक्यातील निंगनुर येथे सुरज आखरे नावाचा तिन वर्षाचा मुलगा बोअरवेलच्या खड्डयात पडला होता. त्याला खड्यातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी काम केल्याबद्दल उमरखेड तहसिलदारासह टीडीआरएफचे हरिश्चंद्र राठोड, शुभम बैस, रोशन राठोड, अभिषेक राजहंस, धीरज राऊत, तनय कोथडे, प्रतिक काळसरपे, पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
राळेगाव तालुक्यात कारेगाव येथे काही दिवसांपूर्वी विहीरीमध्ये गुदमरुन पाच कामगारांचा मृत्यू झाला होता. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी तहसिलदार सुरेश कव्हळे व वडकीचे ठाणेदार अमोल माळवे यांनी स्वत: विहीरीत उतरून धाडस दाखविले होते. त्याबद्दल दोघांचाही पालकमंत्र्यांच्याहस्ते उत्कृष्ठ कार्य पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
महसूल विभागाच्यावतीने चांगल्या कामासाठी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ठ अधिकारी व कर्मचारी पुरस्काराने यवतमाळचे नायब तहसिलदार के.एम. बोरकर तसेच उपविभागीय कार्यालयातील लिपीक रत्नदिप मेश्राम यांना गौरविण्यात आले. पोलीस मुख्यालयातील हवालदार विजय रामरावजी इंगोले यांना पोलीस दलातील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकाच्या सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले होते. त्यांचाही यावेळी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून पालकमंत्र्यांनी गौरव केला.
केळापूर तालुक्यातील बोरगाव येथील तलाठी ए.पी. मुंजेकर यांना आदर्श तलाठी पुरस्कार तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिनानाथ नागोजी आत्राम हे सेवानिवृत्ती नंतरही वणी तहसिल कार्यालयात देत असलेल्या सेवेबद्दल प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)