सहज कर्ज देण्याचे पाॅम्पलेट वाटून अनेकांना घातला हजारोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 05:00 IST2021-03-01T05:00:00+5:302021-03-01T05:00:02+5:30
सचिन लक्ष्मण शिंदे (३२, रा. लक्ष्मीकृपा साेसायटी, अयाेध्यानगर, आर्णी राेड, यवतमाळ. मूळगाव हरू, ता. दारव्हा) असे फसवणूक करणाऱ्या ठगाचे नाव आहे. त्याने साई मायक्राे ॲण्ड आदित्य फायनान्स या नावाने कंपनी काढली. या कंपनीच्या माध्यमातून काेणालाही काेणत्याही कंपनीचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी बतावणी करणारे पाॅम्पलेट वाटले. हे पाॅम्पलेट घेऊन आलेल्या व्यक्तीला प्राेसेसिंग फीमध्ये काही टक्के सवलत देण्याचे आमिष दिले.

सहज कर्ज देण्याचे पाॅम्पलेट वाटून अनेकांना घातला हजारोंचा गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : फसवणुकीसाठी काेण काय शक्कल लढवेल याचा नेम नाही. यवतमाळातील एका ठगाने चक्क काेणालाही सहज कर्ज मिळवून देताे याचे पाॅम्पलेट वाटून प्रचार केला. यातून अनेकांना हजाराेंचा गंडा घातला. हा प्रकार पांढरकवडा पाेलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाला. आता पाेलीस फसवणूक झालेल्यांना तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन करत आहे.
सचिन लक्ष्मण शिंदे (३२, रा. लक्ष्मीकृपा साेसायटी, अयाेध्यानगर, आर्णी राेड, यवतमाळ. मूळगाव हरू, ता. दारव्हा) असे फसवणूक करणाऱ्या ठगाचे नाव आहे. त्याने साई मायक्राे ॲण्ड आदित्य फायनान्स या नावाने कंपनी काढली. या कंपनीच्या माध्यमातून काेणालाही काेणत्याही कंपनीचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी बतावणी करणारे पाॅम्पलेट वाटले. हे पाॅम्पलेट घेऊन आलेल्या व्यक्तीला प्राेसेसिंग फीमध्ये काही टक्के सवलत देण्याचे आमिष दिले. प्रत्येकाकडून त्याने ६५० रुपये इतकी प्राेसेसिंग फी घेतली.
ज्यांना तातडीने कर्ज हवे त्यांच्याकडून ४ हजार ५०० ते ६ हजार ५०० रुपये राेख घेतले. कर्ज मंजूर केले की एसएमएस येईल अशी बतावणी केली. ज्यांनी वाट पाहून एसएमएस आला नाही. अशांनी शिंदेच्या तथाकथित कंपनी कार्यालयात चकरा मारल्या. अशांना सचिन शिंदे याने बाेगस धनादेश दिले. ज्या खात्यात पैसेच नाही, जे खातेच पूर्वीच बंद केले असे धनादेश देऊन फसवणूक केली. अनेकांना गंडा घातल्यानंतर तक्रारदारांची संख्या वाढताच सचिन शिंदे याने पाेबारा केला. मात्र त्याच्या या फसवणुकीमुळे पांढरकवडा येथील एका युवकाने आत्महत्या केली. याप्रकरणात पांढरकवडा पाेलिसांनी सचिनला अटक केली. तेव्हा त्याचे रॅकेट किती माेठे आहे हे उघड झाले. त्याच्यावर भादवि ४२०, ३४ आणि ३०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
याचा तपास पांढरकवडा ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक हेमराज काेळी करत आहे. ज्यांची फसवणूक झाली अशांनी सचिन शिंदेविराेधात तक्रार द्यावी, असे आवाहन पाेलिसांनी सर्व नागरिकांना केले आहे.
आमिषापासून सावध राहण्याची गरज
बेरोजगारी आणि कोरोनाच्या संकटकाळात सहज कर्ज देण्याचे आमिष अनेकजण दाखवित आहे. आर्थिक तंगीमुळे सुशिक्षित वर्गही अशा आमिषांना बळी पडून हातचे पैसे गमावत आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.