तालुका क्रीडा संकुलाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 22:05 IST2017-08-25T22:05:19+5:302017-08-25T22:05:41+5:30
विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर सुसज्ज असे तालुका क्रीडा संकुल शासनाने मंजुर केले.

तालुका क्रीडा संकुलाची दुरवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर सुसज्ज असे तालुका क्रीडा संकुल शासनाने मंजुर केले. काही नवीन तालुक्याचे ठिकाणी क्रीडा संकुलाची निर्मितीही झाली. मात्र वणी तालुक्याला अजूनही सुसज्ज असे तालुका क्रीडा संकुल साकारले नाही. येथील क्रीडा मैदानावर मोडकळीस आलेल्या व सांगाडे उभ्या असलेल्या इमारती तसेच मैदानावर चिखल मातीचे साम्राज्य, अशी क्रीडा संकुलाची अवस्था झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह क्रीडा विभागाचेही दुर्लक्ष होत आहे.
वणी तालुका हा क्रीडा क्षेत्रात पुढारलेला तालुका आहे. येथे खेळाडूंची खाण आहेत. मात्र खेळाडूंना सराव करण्यासाठी मैदानाचा अभाव व त्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाचा अभाव असल्याने वणीचे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात माघारत आहे.
तालुक्याला तालुका क्रीडा संकुल मंजुर होऊन तप लोटले. परंतु क्रीडा संकुलाची निर्मिती अजूनही अपूर्णावस्थेत आहे. क्रीडा विभागाचे एक गोडाऊनसारखे जीर्णावस्थेतील कार्यालय तेवढे संकुल असल्याची जाणिव करून देत आहे. पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या शासकीय मैदानाला सभोवताल संरक्षण भिंत बांधून केवळ बंदीस्त करण्यात आले आहे.
आता मात्र सारेच भकास दिसत आहे. एकाही क्रीडा प्रकारचे येथे कायम मैदान नाही. मैदानावर मातीचा पसारा दिसतो. पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य दिसते. तरीही दररोज सकाळी या मैदानावर शेकडो विद्यार्थी आपल्या क्रीडांचा सराव करताना दिसून येतात. येथे एकाही क्रीडेचे बंदीस्त क्रीडागृह नाही. टेबल टेनीस, लॉन टेनीस, बॅडमींटन, कॅरम या क्रीडासाठी हॉल बांधकाम सुरू होऊन दहा तरी वर्षे लोटली. परंतु या इमारतीचे केवळ सांगाडे दिसून येत आहे. निधीअभावी या क्रीडा इमारतीचे बांधकाम रखडल्याचे सांगण्यात येते.
क्रीडा मैदानाच्या सभोवार प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी तयार नाही. मैदानच नसल्याने क्रीडा साहित्य निरूपयोगी ठरत आहे. तालुक्यात ५० माध्यमिक शाळा आहेत. या शाळांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. मात्र सरावाचा व मार्गदर्शनाचा अभाव असल्याने खेळाडूंना पुढे वाव मिळत नाही.