सरकार-प्रशासनाच्या गतिमानतेने जिल्ह्याला दिलासा
By Admin | Updated: May 26, 2015 01:29 IST2015-05-26T01:29:56+5:302015-05-26T01:29:56+5:30
जिल्ह्यात युती सरकार आणि प्रशासन प्रचंड गतीमान झाल्याने सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकार-प्रशासनाच्या गतिमानतेने जिल्ह्याला दिलासा
राजेश निस्ताने ल्ल यवतमाळ
जिल्ह्यात युती सरकार आणि प्रशासन प्रचंड गतीमान झाल्याने सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वर्षानुवर्षे रखडलेली त्यांची कामे वेगाने मार्गी लागत आहेत. त्यातून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पहायला मिळत आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जनता दरबारांचा सपाटा लावला आहे. या दरबारांना जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत असून शेकडो तक्रारींचा पाऊसही पडतो आहे. सलग आठ ते दहा तास चालणाऱ्या या जनता दरबारात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर ‘आता आपली समस्या सुटणार’ याचा आनंद पाहायला मिळतो आहे. यापूर्वी पालकमंत्र्यांचे केवळ ध्वजारोहण आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांनाच दर्शन व्हायचे. या परंपरेला संजय राठोड यांनी फाटा दिला आहे. मंत्र्यांना आपल्या गृहजिल्ह्यातच पालकमंत्री म्हणून नेमण्याच्या युती सरकारच्या निर्णयाचा हा चांगला परिणाम पहायला मिळत आहे.
जिल्ह्याला सचिंद्र प्रताप सिंग हे नवे जिल्हाधिकारी लाभले आहेत. त्यांनी आढावा बैठकांची जणू मोहिमच हाती घेतली. विशेष असे या बैठका ‘फॉर्मेलिटी’ नाहीत, तर रिझल्ट ओरिएंटेड ठरत आहेत. शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच बैठकांचा फड अनुभवला. आतापर्यंत बँकर्स कमिटीच्या बैठकांना केवळ जिल्ह्याचे प्रमुख व्यवस्थापक उपस्थित राहत होते. मात्र यावेळी पहिल्यांदाच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांच्या सर्व शाखा व्यवस्थापकांना बैठकीत बोलविले. पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट न गाठणाऱ्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. पीक कर्ज न देणे हे क्राईम आहे, असे स्पष्ट करताना आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांपुढे आणखी मानवी संकट लादू नका असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांशी सन्मानाने बोला, त्यांचे समाधान करा अशा सूचना केल्या गेल्या. कर्ज वाटपाची उद्दीष्टपूर्ती न झाल्यास तुमची खैर नाही, अशी तंबीही या बँक व्यवस्थापकांना देण्यात आली. या बैठकीत अनेक व्यवस्थापकांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते एवढी ही बैठक गाजली.