उमरखेड बीडीओ व ग्रामसेवकात वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:00:30+5:30

तालुक्यातील ग्रामसेवक एम.जी. सगरुळे बुधवारी वैद्यकीय रजेचा पगार मिळण्यासंदर्भात पंचायत समितीत गेले होते. त्यांनी तेथील बाबू हाडसे यांना विचारणा केली. हाडसे यांनी सगरुळे यांना गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेण्याची सूचना केली. त्यांच्यासोबत ग्रामसेवक बीडीओंच्या कक्षात पोहोचले. तेथे बीडीओ जयश्री वाघमारे व ग्रामसेवक सगरुळे यांच्यात वाद झाला.

Dispute between Umarkhed BDO and Gramsevak | उमरखेड बीडीओ व ग्रामसेवकात वाद

उमरखेड बीडीओ व ग्रामसेवकात वाद

ठळक मुद्देसीईओंना निवेदन : बीडीओंनी बेल फेकून मारली, शिवीगाळही केली

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : येथील पंचायत समितीत गटविकास अधिकारी आणि एका ग्रामसेवकामध्ये बुधवारी वाद झाला. या वादातून आपल्याला शिवीगाळ करून बेल फेकून मारल्याचा आरोप ग्रामसेवकाने केला. या प्रकरणात ग्रामसेवक कर्मचारी संघटनेने गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
तालुक्यातील ग्रामसेवक एम.जी. सगरुळे बुधवारी वैद्यकीय रजेचा पगार मिळण्यासंदर्भात पंचायत समितीत गेले होते. त्यांनी तेथील बाबू हाडसे यांना विचारणा केली. हाडसे यांनी सगरुळे यांना गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेण्याची सूचना केली. त्यांच्यासोबत ग्रामसेवक बीडीओंच्या कक्षात पोहोचले. तेथे बीडीओ जयश्री वाघमारे व ग्रामसेवक सगरुळे यांच्यात वाद झाला. बीडीओंनी तुम्हाला समजत नाही का, मला का भेटले नाही, तुम्ही मुर्ख आहात का, लाज वाटत नाही का आदी प्रश्नांचा भडीमार केला. सोबतच संतापून बीडीओंनी आपल्याला बेल फेकून मारली. नंतर पुन्हा पाण्याची बॉटल फेकून मारण्यासाठी तीनदा उगारली. तसेच तुम्ही सीईओकडे जा पण तुम्हाला पगार भेटणार नाही, अशी तंबी दिली.
या घटनेने आपले मानसिक खच्चीकरण झाल्याचा आरोप सगरुळे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना बुधवारीच निवेदन दिले. दरम्यान या वादात आता महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने उडी घेतली आहे. युनियनने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन बीडीओवर कारवाईची मागणी केली आहे. बीडीओकडून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी संवर्गावर नेहमी अन्याय केला जातो, असा आरोप युनियनने निवेदनातून केला. निवेदन देताना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक मस्के, वरिष्ठ सल्लागार राजेश साव, उमरखेड तालुकाध्यक्ष एस.पी. बोंडे व स्वत: मारोती सगरुळे उपस्थित होते.
दरम्यान, या संदर्भात गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या भ्रमणध्वनी स्विच आॅफ येत होता. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.

संबंधित बीडीओ यांची पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसोबतची वागणूक नेहमी वादग्रस्त आहे. त्या नेहमी ग्रामसेवकांवर दबाव तंत्राचा वापर करून आर्थिक सोईची कामे करून घेतात.
- माणिक मस्के,
जिल्हाध्यक्ष, म.रा. ग्रामसेवक युनियन

Web Title: Dispute between Umarkhed BDO and Gramsevak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.