आर्णी जिनिंग प्रेसिंगचे प्रशासकीय मंडळ बरखास्त
By Admin | Updated: June 13, 2015 02:37 IST2015-06-13T02:37:42+5:302015-06-13T02:37:42+5:30
येथील वादग्रस्त शेतकरी सहकारी जिनिंग अॅन्ड प्रेसिंग संस्थेवर नियुक्त करण्यात आलेले प्रशासकीय मंडळ शासनाच्या एका आदेशाने बरखास्त करण्यात आले ...

आर्णी जिनिंग प्रेसिंगचे प्रशासकीय मंडळ बरखास्त
अवसायनात संस्था : शासकीय प्रशासकाची नियुक्ती
आर्णी : येथील वादग्रस्त शेतकरी सहकारी जिनिंग अॅन्ड प्रेसिंग संस्थेवर नियुक्त करण्यात आलेले प्रशासकीय मंडळ शासनाच्या एका आदेशाने बरखास्त करण्यात आले असून त्या जागी महाराष्ट्र शासनाचा अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आला आहे.
काही वर्षापूर्वी आर्णी येथील शेतकरी जिनिंग अॅन्ड प्रेसिंग संस्था भरभराटीस आली होती. मात्र चुकीच्या धोरणामुळे ही संस्था अवसायनात जावून बंद पडली. यानंतर या संस्थेच्या नऊ एकर जागेवर सर्वांचा डोळा होता. ही जागा गिळंकृत करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. एका आमसभेत शेतकरी सभासद दिगांबर बुटले, विठ्ठल देशमुख, प्रवीण शिंदे यांनी तो प्रयत्न हाणून पाडला. मात्र विद्यमान प्रशासकीय मंडळाने बँकेच्या कर्जाचा बहाणा करून सदर जागा ११ कोटी रुपयात विकून टाकली. त्यानंतर असंतोष निर्माण झाला. कवडीमोल भावात विकलेली ही जागा आणि त्यात झालेला गैरव्यवहार यावरून प्रशासकीय मंडळावर प्रश्नचिन्ह लागले. सहकार न्यायालयातही दाद मागण्यात आली. आता ३१ मार्च २०१३ पूर्वी मुदत संपल्याने प्रशासकीय मंडळ बरखास्त करण्यात आल्याबाबतचे पत्र ३० मे २०१५ रोजी प्राप्त झाले. या पत्रान्वये प्रशासकीय मंडळ बरखास्त करण्यात आले. आता या ठिकाणी सहाय्यक अधिकारी पी.जी. राठोड यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. सदर संस्थेची निवडणूक सहा महिन्याच्या आत पार पडावी, असे आदेशात म्हटले आहे.
या आदेशाची प्रत मुख्य प्रशासक भूपेंद्र देवराव शिंदे, सुनील भारती, अमोल मांगुळकर, नंदू राठी, शिवाजी दुमारे, शे.जाफर शे.रज्जाक यांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या शिफारसीवरूनच या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)