दूषित पाण्यामुळे आजार बळावले
By Admin | Updated: April 12, 2015 00:05 IST2015-04-12T00:05:08+5:302015-04-12T00:05:08+5:30
तालुक्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथींच्या आजारात वाढ होत आहे़...

दूषित पाण्यामुळे आजार बळावले
पांढरकवडा तालुका : अशुद्ध पाण्यामुळे ग्रामस्थ बेजार, फ्लोराईडयुक्त पाणीही आले नशिबी
पांढरकवडा : तालुक्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथींच्या आजारात वाढ होत आहे़
ग्रामीण भागात विहिरी, नद्या, नाले, हातपंप याद्वारे गावकरी आपली पाण्याची गरज भागवतात़ जनतेला शुद्ध पाणी पोहोचविणे ही शासनाची जबाबदारी आहे़ त्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजनाही केल्या जातात़ मात्र प्रशासनातर्फे त्याची योग्य ती अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे़ ग्रामीण भागातील जनताही जे पाणी जशा प्रकारे मिळेल, ते पाणी प्राशन करून अनेक आजारांना निमंत्रण देत आहे़
ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून जिल्हा परिषदेमार्फत अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या़ तथापि या योजना राबविल्याच जात नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्राशन करावे लागत आहे. तालुक्यात अनेक गावांत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे़ हातपंप, सार्वजनिक विहिरी, ट्युबवेल यातूनही नागरिकांना पाणी पुरवठा होतो़ पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही, यासाठी पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणे आवश्यक आहे़ तशा स्पष्ट सूचनाही प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत़ मात्र या सूचनांकडे गंभीरतेने पाहिल्या जात नाही़ स्थानिक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते़
पाणी अशुद्ध आहे हे माहित असूनही बरेचदा पाण्याचे दुसरे कोणतेही स्त्रोत उपलब्ध नसल्यामुळे त्याच पाण्याचा पुरवठा केला जातो़ अनेक गावात फ्लोराइडयुक्त पाणी असून ते पिण्यास अयोग्य आहे़ तरीही ग्रामस्थांना तेच पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे अनेकांना हाडांचे आजार झाले आहेत़ सर्वाधिक फ्लोराइडयुक्त पाणी तालुक्यात मंगी (कोलाम पोड) या गावात आहे़ (तालुका प्रतिनिधी)
दूषित पाण्याला डॉक्टरांचा दुजोरा
पाणी ज्या स्त्रोतापासून मिळते त्या विहिरी, हातपंपांजवळ मोठ्या प्रमाणात घाण पसरलेली असते़ त्यामुळे पाणी दूषित होते़ पाण्यात नियमित ब्लिचिंग पावडरही टाकले जात नाही़ त्यामुळे याच दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारात सतत वाढ होत असल्याचे येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़ सध्या तालुक्यात साथीच्या आजारांनी जोर पकडला आहे़ दूषित पाण्यामुळे या आजारात सतत वाढ होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे़ पाण्याचे स्त्रोत स्वच्छ राखण्यासाठी यंत्रणा नाही़ त्यामुळेच ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागत असून विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे़