खंडीत विजेने महागाव वैतागले
By Admin | Updated: June 19, 2017 00:48 IST2017-06-19T00:48:59+5:302017-06-19T00:48:59+5:30
येथील वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा फटका ग्राहकांना बसत असून, साधी वाऱ्याची झुळक आली तरी वीज पुरवठा खंडीत होतो.

खंडीत विजेने महागाव वैतागले
अंधाराचे साम्राज्य : वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : येथील वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा फटका ग्राहकांना बसत असून, साधी वाऱ्याची झुळक आली तरी वीज पुरवठा खंडीत होतो. शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी मोठा कालावधी लागतो. परिणामी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. यामुळे वीज ग्राहकात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महागाव तालुक्यातील वीज वितरणचा कारभार गेल्या काही दिवसांपासून ढेपाळला आहे. शहर आणि ग्रामीण भागात अनियमित वीज पुरवठा होत आहे. गत आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. तर शहरातील ट्रान्सफार्मरचे स्फोट होण्याचे प्रकार घडत आहेत. दोन दिवसापूर्वी येथील तहसील कार्यालयासमोरील ट्रान्सफार्मरचा स्फोट झाला होता. त्यात दोन महिला जखमी झाल्या. या प्रकाराकडेही वीज वितरणने दुर्लक्ष केले आहे. महागाव, गुंज, काळी दौ., अनंतवाडी, मुडाना, फुलसावंगी येथे ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र आहे. परंतु हे केंद्र केवळ शोभेची वास्तू झाले आहे. वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता जितेश गजभिये यांच्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणाला आळा बसला होता. परंतु त्यांची बदली राळेगाव येथे करण्यात आली. त्यामुळे पूर्वीसारखीच अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांसह लघुउद्योगांनाही त्याचा फटका बसतो. बँकांचा वीज पुरवठा खंडीत होत असल्याने व्यवहार ठप्प होतात. कर्मचारी मुख्यालयी राहात ााहीत. परिणामी महागाव शहरातील ग्राहकांसह ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
आज शिवसेनेचे आंदोलन
वीज वितरण कंपनीच्या विरोधात सोमवारी शिवसेनेने आंदोलन पुकारले आहे. शिवसेनेचे रामराव पाटील यांच्या नेतृत्वा वीज वितरण कंपनीसमोर आंदोलन केले जाणार आहे. तसेच जनुना येथील गावकरीही या आंदोलनात सहभागी होणार आहे. जनुना येथे उच्च दाबाने अनेकांचे मीटर व विद्युत उपकरणे भस्मसात झाली होती. या आंदोलनात शिवसैनिक सहभागी होणार असून, वीज वितरण कार्यालयाला घेराव घालणार आहेत.