शिस्तबद्ध जीवन हेच सुखाचे साधन
By Admin | Updated: November 14, 2016 01:37 IST2016-11-14T01:37:05+5:302016-11-14T01:37:05+5:30
सेवा, समर्पण आणि सहकार्याची भावना अगदी पुरातन काळापासून मानवी मनात वसत आली आहे.

शिस्तबद्ध जीवन हेच सुखाचे साधन
जीवन देशमुख : निवृत्त अभियंता मित्र मंडळाची व्याख्यानमाला
यवतमाळ : सेवा, समर्पण आणि सहकार्याची भावना अगदी पुरातन काळापासून मानवी मनात वसत आली आहे. अगोदरच्या काळात या भावनांचे प्रकटीकरण मानवाकडून मोठ्या प्रमाणात व्हायचे. परंतु आज या भावना फारशा प्रकट होताना दिसत नाही. कारण आपण आपली जीवनशैली झपाट्याने बदलायला लागलो आहोत. परंतु शिस्तबद्ध जीवन हेच सुखाचे साधन आहे, ही गोष्ट आपण विसरता कामा नये, असे उद्गार जीवन देशमुख यांनी काढले.
निवृत्त अभियंता मित्र मंडळाद्वारे येथे आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत ‘हसत खेळत तणावमुक्त जीवन’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, वेदना हृदयात सांभाळता आल्या असत्या तर नेत्रात अश्रू आलेच नसते. अश्रूंद्वारे वेदना बाहेर पडतात आणि आपण तणावमुक्त होतो. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ‘जिंदगी का नाम कभी खुशी गभी गम है’ ही गोष्ट आपणास स्वीकारता आली पाहिजे. शुद्ध आचार, शुद्ध विचार आणि निसर्गानुकुल दिनचर्या यावर आपण लक्ष केंद्रीत करू शकलो तर हसत खेळत तणावमुक्त जीवन जगणे मानवास सहज शक्य आहे. परमेश्वराने सर्वांनाच बुद्धी दिलेली आहे. त्याचा योग्य वापर करता आला तर जीवनातील उदासीनता, निराशा दूर होवून हसत-खेळत तणावमुक्त जीवन सहजपणे जगता येते, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष गोपाळराव भास्करवार होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसुधा पांडे यांनी स्वागतगीत सादर केले. माजी खासदार राजाभाऊ ठाकरे यांच्या हस्ते जीवन देशमुख यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय किशोर इंगळे यांनी करून दिला. संचालन वसंत पांडे यांनी केले. उत्तम राठोड यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. (वार्ताहर)