आरोग्यदूत ‘आशा’च्या पदरी निराशाच

By Admin | Updated: February 20, 2015 01:48 IST2015-02-20T01:48:07+5:302015-02-20T01:48:07+5:30

आरोग्य क्षेत्रात मुलभूत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने शासनाने आरोग्य अभियान राबविणे सुरू केले आहे. ग्रामीण भागात या अभियानासाठी ‘आशा’ची नियुक्ती केली आहे.

The disappointment of the health of 'Aastha' | आरोग्यदूत ‘आशा’च्या पदरी निराशाच

आरोग्यदूत ‘आशा’च्या पदरी निराशाच

मांगलादेवी : आरोग्य क्षेत्रात मुलभूत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने शासनाने आरोग्य अभियान राबविणे सुरू केले आहे. ग्रामीण भागात या अभियानासाठी ‘आशा’ची नियुक्ती केली आहे. आरोग्य खात्याच्या योजना व संदेश ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविण्याची धुरा ‘आशा’च्या खांद्यावर आहे. त्या देखील सक्षमपणे आपले कार्य पार पाडत आहेत. मात्र हे काम करीत असताना त्यांच्या पदरी केवळ उपेक्षाच येत आहे.
आरोग्य विभागात गलेलठ्ठ पगार घेवून मुख्यालयी न राहता केवळ मोबाईलवरून आशांची संपर्क साधून गावांच्या आरोग्याचा गाडा हाकणारे अनेक अधिकारी, कर्मचारी आहेत. मात्र रात्रंदिवस या अभियानात झटणाऱ्या ‘आशां’ना शासनाकडून पगार तर सोडाच मानधनही वेळेवर मिळत नाही. ग्रामीण भागात आरोग्य विभागांतर्गत काम करणाऱ्या ‘आशां’ना आतापर्यंत विनावेतन काम करावे लागत होते. शासनाने १ एप्रिल २०१४ पासून ५०० रुपये असे अत्यल्प मानधन मंजूर केले आहे. परंतु अद्याप ते देखील मिळाले नाही. कामाचा मोबदला देखील चार-पाच महिने त्यांना मिळत नाही. बाल संगोपन, कुटुंब कल्याण, हिवताप, क्षयरोग, कुष्ठरोग, साथरोग, हत्तीपाय, जंतांचे औषधी वाटप, विविध प्रकल्पांचा सर्वे, शौचालय बांधणे व वापरण्यास नागरिकांना प्रोत्साहित करणे, गरोदर मातांना दवाखान्यातच प्रसूतीकरिता प्रोत्साहित करणे, प्राथमिक तपासणी, प्रसूती, प्रसूतीनंतरचे लसीकरण, पल्स पोलिओ आदी अनेक महत्त्वपूर्ण कामे आणि आरोग्यासंबंधीच्या राष्ट्रीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये ‘आशां’चा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची तपासणी आदींमध्येदेखील आशा स्वयंसेविकांचा सक्रिय सहभाग असतो. आशा स्वयंसेविकांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे. पूर्वी मोलमजूरी करून आशा स्वयंसेविका आपला संसार चालवायच्या. आता स्त्री आरोग्यदूत म्हणून कार्य करीत असताना तिला अंगणवाडी सेविकांप्रमाणे सात हजार रुपये मासिक वेतन मिळावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. (वार्ताहर)

Web Title: The disappointment of the health of 'Aastha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.