अपंग दाम्पत्याची लोकसेवा
By Admin | Updated: February 13, 2016 02:17 IST2016-02-13T02:17:28+5:302016-02-13T02:17:28+5:30
अपंगांसाठी (दिव्यांग) शासनाच्या अनेक योजना आहेत. पण त्यांचा नेमका फायदा कुणाला होता, हा प्रश्न आहे. परंतु कोणत्याही योजनेची ...

अपंग दाम्पत्याची लोकसेवा
वटफळी येथील आदर्श : रिक्षा चालवून गावाला पाणीपुरवठा
किशोर वंजारी नेर
अपंगांसाठी (दिव्यांग) शासनाच्या अनेक योजना आहेत. पण त्यांचा नेमका फायदा कुणाला होता, हा प्रश्न आहे. परंतु कोणत्याही योजनेची वाट न पाहता काबाडकष्ट करीत उपजीविका करणारे अपंग दाम्पत्य कौतुकाचे मानकरी ठरले आहे. केवळ उपजीविकाच नव्हे तर ते लोकसेवाही करीत आहे.
तालुक्यातील वटफळी येथे राहणारे संजय अजाबराव यादव हे दृष्टिहीन आहेत. दोन्ही डोळे नसल्याने केवळ इशाऱ्याच्या आधारावरच ते जगाशी संवाद साधतात. २० वर्षांपूर्वी पुसद तालुक्यातील माळकिन्ही येथील संगीता नलगे हिच्याशी त्यांचा विवाह झाला. संगीतासुद्धा कर्णबधिर आहे. पती-पत्नी दोघेही अपंग असल्याने त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. पण त्यांनी हार मानली नाही.
वटफळी गावात नेहमीच पाण्याची टंचाई असते. या गावात नळयोजना आहे. पण पाईपलाईन फुटल्यामुळे ग्रामस्थांना पाणी मिळणे कठीण आहे.
ही बाब संगीताने हेरली. पतीला सांगून एक जुनी रिक्षा आणली. या रिक्षावर प्लास्टिक ड्रम बसविला. हे दाम्पत्य विहिरीतून पाणी ओढते. मग वटफळीतील नागरिकांना घरोघरी जावून पाणी पुरवते. हाच उपक्रम त्यांच्या जगण्याचा आधार बनला आहे. त्यातूनच त्यांनी पीठ गिरणी सुरू केली. प्रज्वल आणि प्रांजली अशी दोन अपत्य त्यांना आहे. हे अपंग दाम्पत्य आता धीर खचलेल्या इतर लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.