जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांचीही ‘दिवाळी’

By Admin | Updated: November 7, 2015 02:31 IST2015-11-07T02:31:17+5:302015-11-07T02:31:17+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या साडेपाचशेवर अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘सव्वा-पगार’ (१०.३३ टक्के) दिवाळी बोनस दिला जाणार आहे.

Directorate of District Central Bank, Diwali | जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांचीही ‘दिवाळी’

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांचीही ‘दिवाळी’

कर्मचाऱ्यांना बोनस : दीड कोटींचे गणित, २७ लाखांची ‘मार्जीन’
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या साडेपाचशेवर अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘सव्वा-पगार’ (१०.३३ टक्के) दिवाळी बोनस दिला जाणार आहे. त्यात बँकेच्या संचालकांचीही ‘दिवाळी’ साजरी होणार असल्याचे बिंग कर्मचाऱ्यांच्या चर्चेतूनच फुटले आहे. टक्केवारीच्या गणितानुसार सुमारे २७ लाखांची ही ‘मार्जीन’ राहणार असल्याची माहिती आहे.
जिल्हा बँकेच्या सर्व ५४१ कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचा प्रस्ताव गत आठवड्यात संचालक मंडळापुढे आला. व्यवस्थापनाने पंधरा दिवसांच्या पगाराऐवढी बोनसची शिफारस केली होती. मात्र ती धुडकावून कर्मचाऱ्यांना ‘सव्वा-पगार’ बोनस देण्याचे निश्चित झाले. त्यापोटी बँकेच्या तिजोरीवर दीड कोटींचा बोझा पडणार आहे. मात्र बोनस मिळूनही काही कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळाला. त्याबाबत माहिती घेतली असता कर्मचाऱ्यांच्या या बोनसमध्ये बँकेचे संचालकही दिवाळी साजरी करणार असल्याचे सांगितले गेले. ‘सव्वा-पगार’ बोनस ठरला आहे. त्यातील एक पगार कर्मचाऱ्याला दिला जाणार असून ‘सव्वा’ (बोनसच्या २५ टक्के रक्कम) ही रक्कम संचालकांच्या वाट्याला जाणार असल्याचे बोलले जाते. कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवरही ‘ताव’ मारण्याच्या वृत्तीविरुद्ध जिल्हा बँकेत तीव्र नाराजी पाहायला मिळते. यापूर्वीसुद्धा कर्मचाऱ्यांना अशाच पद्धतीने ‘मार्जीन’ ठेऊन पगारवाढ, बोनस दिले गेले आहे. त्यातही लाखो रुपयांची ‘उलाढाल’ झाली.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. मात्र या बँकेत अनेकदा शेतकरीच उपेक्षित राहतो. बँकेला केवळ दाखविण्यापुरता नफा असताना आणि दुष्काळी परिस्थिती असताना कर्मचाऱ्यांना बोनस दिला गेला. त्यातही संचालकांनी आपली हात धुवून घेण्याची खेळी खेळली. वास्तविक याला काही संचालकांनी मनातून विरोधही दर्शविला. मात्र त्यांची संख्या अगदीच बोटावर मोजण्याऐवढी असल्याने बँकेतील या ‘दिग्गज’ संचालकांपुढे त्यांचे फारसे काही चालले नाही. जिल्हा बँकेच्या साडेतीनशे कर्मचाऱ्यांमध्ये ‘सव्वा-शेर’ ठरलेल्या संचालकांच्या ‘अर्थ-नीती’ची यवतमाळातील पाचकंदील चौकात चांगलीच चर्चा ऐकायला मिळते.
जिल्हा बँक किंंचित नफ्यात दिसत असली तरी हा नफा वाढविण्यासाठी भरपूर वाव आहे. मात्र त्यासाठी बँकेला आपल्या खर्चावर नियंत्रण आणावे लागणार असल्याचे बँकेच्याच काही ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचे मत आहे. बँकेचा भत्ते, खान-पान, दौरे, वाहने याचाच खर्च मोठ्या प्रमाणात आहे. भाड्याच्या गाड्यांमध्येही बरेच गौडबंगाल पहायला मिळते. हा खर्च व होणारी उधळपट्टी शेतकऱ्यांच्या नजरेतून लपलेली नाही, एवढे निश्चित. (जिल्हा प्रतिनिधी)

एकाच दिवशी ‘क्रेडिट’ आणि ‘डेबीट’ : ‘सहकार’पुढे आव्हान
जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसची रक्कम एकाच दिवशी ‘क्रेडिट’ आणि त्याच दिवशी ‘मार्जीन’ची रक्कम ‘डेबीट’ झाल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळी बोनसची रक्कम जमा केली गेली. त्यानंतर ‘ठरल्याप्रमाणे’ सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या बोनसमधील ‘सव्वा’ हा वरच्या रकमेचा आकडा असलेल्या स्लीप भरल्या आणि ‘मार्जीन’ची ती रक्कम संचालकांनी नेमलेल्या एजंटांच्या स्वाधीन केली. ही रक्कम पांढरकवडा, दारव्हा, वणी, पुसद व यवतमाळ या विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांमधूनच संचालकांचे एजंट बनलेल्यांनी शुक्रवारी रात्री जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाचकंदील चौक स्थित मुख्यालयात सुखरुप पोहोचविली. आता त्याचे संचालकांच्या अनुभव आणि क्षमतेनुसार ‘वाटे’ केले जाणार असून त्या रकमासुद्धा बहुतांश संचालकांच्या घरापर्यंत सुरक्षितरीत्या पोहोचविल्या जाणार असल्याची चर्चा आहे. विशेष असे ‘सव्वा-पगार’ दिवाळी बोनसमधील ‘सव्वा’ रकमेच्या या ‘मार्जीन’बाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही संघटनेने ‘ब्र’सुद्धा काढलेला नाही. त्यांनी जणू या दिग्गज संचालकांपुढे लोटांगणच घातल्याचे दिसून येते. एकाच दिवशी ‘क्रेडीट’ आणि ठराविक रकमेचे सर्व कर्मचाऱ्यांनी एकाच दिवशी केलेले विड्रॉल हे भक्कम पुरावा ठरणार आहे. मात्र त्यासाठी प्रामाणिकपणे चौकशी करण्याची सहकार प्रशासनाची तयारी असणे तेवढेच गरजेचे आहे. जिल्हा बँकेची अनेक वादग्रस्त प्रकरणे पुढे आली. मात्र सहकार प्रशासनाने केवळ नोटीसच्या खानापूर्तीशिवाय काहीही कारवाई केली नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. म्हणूनच जिल्हा बँकेचे संचालक सहकार प्रशासनाला आपल्या ‘ताटाखालील मांजर’ समजू लागले आहे. त्यामुळे बोनसमधील ‘सव्वा-शेर’च्या प्रकरणातही सहकार प्रशासनाकडून फार काही हालचाली होतील, याची खात्री जिल्हाभरातील शेतकऱ्यांना आणि बोनस मिळूनही संचालकांनी ‘वाटा’ घेतल्याने नाराज झालेल्या कर्मचाऱ्यांना वाटत नाही.

Web Title: Directorate of District Central Bank, Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.