अन्नसुरक्षा योजनेत कृषी अवजारांची थेट खरेदी
By Admin | Updated: August 28, 2015 02:33 IST2015-08-28T02:33:45+5:302015-08-28T02:33:45+5:30
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडविण्यासाठी उत्पादन वाढीवर भर दिला जात आहे.

अन्नसुरक्षा योजनेत कृषी अवजारांची थेट खरेदी
यवतमाळ : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडविण्यासाठी उत्पादन वाढीवर भर दिला जात आहे. यासाठी यांत्रिकीकरणाची मदत घेतली जाणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने अनुदानावर अवजारे देण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी अवजारे कृषी विभागातून खरेदी करावी लागत होती. आता ही अवजारे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेतून खरेदी करता येणार असल्याने गैरप्रकाराला आळा बसणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या हातात आधुनिक कृषी अवजारे सोपविली जाणार आहेत. ही कृषी अवजारे महाग आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक आवाक्या बाहेर आहेत. त्यामुळे कृषी अवजारे अनुदानावर वितरीत होणार आहे. पूर्वी ही अवजारे निकृष्ट असल्याचा आरोपही झाला आहे. यावर मात करण्यासोबत दर्जेदार वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून केंद्र सरकारने नवा आदेश काढला आहे. यामध्ये यांत्रिकीकरणातील साहित्याची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मुभा राहणार आहे. त्यामुळे दर्जेदार वस्तू शेतकऱ्यांच्या हातात पडतील. कृषी विभागाकडून झालेल्या तपासणी नंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याबाबतचे आदेश कृषी संचालक के.व्ही. देशमुख यांनी काढले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून कोणते साहित्य खरेदी करायचे, किमत काय असेल याबाबतच्या सूचना मिळायच्या आहेत. मात्र अदेशानुसार साहित्याची खरेदी करण्याचा मार्ग खूला झाला आहे. योजनेतील गैरप्रकार टळण्यास मदत होणार आहे. (शहर वार्ताहर)