अविनाश साबापुरे यवतमाळ : मतदान केंद्रांवर काम करणारे शिक्षक पाहण्याची आता सवयच झाली आहे. हे अतिरिक्त काम मिळाल्याची ओरड करणारेही शिक्षक कमी नाहीत. पण यातल्याच एका शिक्षकाने चक्क निवडणूक आयोगाला मतदान प्रक्रियेवरील खर्च कमी करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. डिजिटल तंत्रज्ञान वापरून खर्च, वेळ आणि मनुष्यबळ वाचविण्याचा हा प्रस्ताव आयोगाच्या पसंतीस उतरला असून येत्या आॅगस्टमध्ये त्याची चाचणीही घेतली जाणार आहे. १९५२ ते २००४ या कालावधीतील निवडणुकांचा विचार करता मतदान प्रक्रियेवर होणारा खर्च १० कोटींवरून १३०० कोटींवर पोहोचला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून हा खर्च जवळपास अर्ध्यावर आणता येईल, असा प्रस्ताव सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले या जिल्हा परिषद शिक्षकाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. त्यांचे २२ मिनिटांचे प्रेझेंटेशन आयोगाला आवडले असून आॅगस्टमध्ये डिजिटल मतदानाची चाचणी घेतली जाणार आहे. त्यासाठी लागणारी साधन सामुग्री उपलब्ध करून दोन महिन्यात तयारी करण्याची सूचना आयोगाने डिसले यांना केली आहे. सध्या ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, परंतु तो केवळ मतमोजणी सुकर व्हावी एवढ्यापुरताच मर्यादित आहे. प्रत्यक्ष मतदान कक्षातील प्रक्रियेत तंत्रज्ञान वापरल्यास खर्च ४७ टक्क्यांनी कमी होईल. मनुष्यबळाची संख्याही ४० टक्क्यांनी कमी होईल. शिवाय मतदान कक्षातील साहित्याची संख्याही अर्धी होईल, असा दावा या प्रस्तावात करण्यात आला आहे. आॅगस्ट महिन्यात या पद्धतीचे प्रात्यक्षिक पहिल्यानंतर आयोग पुढील निर्णय घेणार असल्याचे रणजितसिंह डिसले यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले. - डिजिटल मतदार यादीमतदान प्रक्रियेतील सर्वात किचकट बाब म्हणजे बिनचूक मतदार यादी तयार करणे. मतदान केंद्रावर छापील मतदार याद्या देण्याऐवजी एका टॅबमध्ये त्या केंद्राची मतदार यादी डिजिटल स्वरुपात साठविलेली असेल. त्यामुळे कागदाची बचत होणार आहे. सध्याच्या पारंपरिक यादीपेक्षा डिजिटल यादी सुटसुटीतही होणार आहे. डिजिटल यादीत प्रत्येक मतदाराचा आधार क्रमांक जोडला जाईल व मतदाराच्या बायोमेट्रिकचा समावेश केला जाईल. त्यामुळे बोगस मतदार, दुबार मतदान अशा गोष्टींना आळा बसेल. डिजिटल मतदार यादीमुळे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नवी यादी छापण्याऐवजी जुनीच यादी दरवेळी अपडेट करता येईल. त्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर ह्यडेटा बँकह्ण तयार करून त्या माध्यमातून हवी ती मतदार यादी टॅबमध्ये अपलोड करता येईल. - आपला अंगठा हीच आपली ओळखडिजिटल मतदार यादी असलेला टॅब थंम्ब स्कॅनर यंत्राला जोडला जाईल. केंद्रात आल्यावर मतदार त्याचा अनुक्रमांक, आधार क्रमांक सांगेल. त्यानुसार मतदार अधिकारी यादीत नाव शोधेल आणि मतदाराची ओळख पटवण्यासाठी त्याचा अंगठा थंम्ब स्कॅनरवर स्कॅन करेल. आधार क्रमांकातील बायोमेट्रिकशी हे अंगठ्याचे बायोमेट्रिक जुळले तर त्या मतदाराची ओळख डिजिटल स्वरुपात साठविली जाईल. यामुळे आयोगाला मतदार ओळखपत्रे छापण्याचा खर्च करावा लागणार नाही. मतदान केल्याची खूण म्हणून बोटाला शाई लावण्याचीही गरज पडणार नाही. कारण डिजिटल डेटा बँकेत एकाच आधार क्रमांकाची नोंद दोनदा घेतली जाणार नाही. - आॅटो जनरेटेड रिपोर्ट सिस्टममतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतरही मतदान अधिकाऱ्यांना विविध १७ प्रकारचे अहवाल तयार करावे लागतात. डिजिटल यंत्रणेत हे अहवाल ह्यआॅटो जनरेटेड रिपोर्ट सिस्टम (स्वयंचलित) द्वारे तयार होतील. तसेच स्क्रिन सिग्नेचरच्या मदतीने ते वैध ठरवता येतील. हे अहवाल टॅबमधील चिपमध्ये जतन केले जाऊ शकतात. त्यामुळे अधिकारी वर्गाला कमी वेळात अधिक कार्यभार पार पाडता येईल. व्होटर स्लिपचीही गरज पडणार नसल्याने मतदान केंद्र पेपरलेस होण्यास मदत होईल.
महागड्या मतदान प्रक्रियेवर डिजिटल उतारा
By admin | Updated: May 11, 2017 19:45 IST