दोन तालुक्यांना वेगवेगळे निकष
By Admin | Updated: June 24, 2016 02:46 IST2016-06-24T02:46:55+5:302016-06-24T02:46:55+5:30
हवामानावर आधारित पीक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी ३० किमीच्या अंतरात वेगवेगळे निकष लावले आहे.

दोन तालुक्यांना वेगवेगळे निकष
पीक विमा : पुसदला १८ हजार, तर महागावला १६०० रुपये
महागाव : हवामानावर आधारित पीक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी ३० किमीच्या अंतरात वेगवेगळे निकष लावले आहे. पुसद तालुक्यात हेक्टरी १६ ते १८ हजार रुपये तर महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना केवळ १६०० रुपये हेक्टरी मंजूर झाले. ही प्रचंड तफावत कशी, याचे साधे उत्तर सध्या कुणाजवळही नाही. महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर हा अन्याय असून या विरोधात २६ जून रोजी आधार संघर्ष समितीने एल्गार पुकारला आहे.
सोयाबीन, कपाशीला पीक संरक्षण म्हणून १६०० रुपये भरून देण्यात आले होते. विमा संरक्षण मंजूर झाले तेव्हा पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना १६ ते १८ हजार रुपये देण्यात आले. तर महागावसाठी केवळ १६२० रुपये मंजूर केले. ही तफावत शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असून या विरोधात आधार संघर्ष समितीने एल्गार पुकारला आहे. डी.बी. नाईक, जगदीश नरवाडे शेतकऱ्यांसाठी लढा देत आहे. गतवर्षी सोयाबीनचा एक दाणाही घरात आला नाही. आॅगस्टमध्ये सोयाबीनला खोडकिड लागली. जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विद्यापीठाची चमू महागाव तालुक्यात पाठविली. या समितीने रवींद्र राऊत, अशोक वानखेडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पाहणी केली. तज्ज्ञ समितीने अहवाल दिला. कीडीचा प्रादूर्भाव असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला. एकीकडे सोयाबीनवर खोडकिड असताना त्याला हवामानातील बदल कारणीभूत असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला. त्यावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. आता पीक विम्यातही शेतकऱ्यांवर अन्याय होत असून ३० हजार शेतकरी वाऱ्यावर आहेत. (शहर प्रतिनिधी)