बोथबोडनमध्ये डायरियाची साथ
By Admin | Updated: June 28, 2015 00:13 IST2015-06-28T00:13:00+5:302015-06-28T00:13:00+5:30
अशुद्ध पाणी प्राशनाने यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन येथे गत तीन दिवसांपासून डायरियाचे थैमान सुरू असून,

बोथबोडनमध्ये डायरियाची साथ
डझनावर रूग्ण : अशुध्द पाणी, आरोग्य पथक दाखल
यवतमाळ : अशुद्ध पाणी प्राशनाने यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन येथे गत तीन दिवसांपासून डायरियाचे थैमान सुरू असून, डझनावर नागरिकांना याची लागण झाली आहे. अनेक रुग्णांवर यवतमाळच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, आरोग्य विभागाने गावातही शिबिर उघडले आहे.
यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन येथे बुधवारी रात्री अचानक अनेकांना उलटी आणि हगवणीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेकांना हाच त्रास सुरू झाला. त्यामुळे या बाबीची माहिती हिवरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आली. आरोग्य अधिकारी डॉ. पी.जे. नागभिडकर सध्या बोथबोडन येथे तळ ठोकून आहेत.
समाज भवनात दवाखाना उघडून रुग्णांवर उपचार केले जात आहे. मात्र रुग्णांची प्रकृती आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे सुमित्रा वासुदेव राठोड, विमल विष्णू चव्हाण, कांचन माघाडे, उमा विजय शेळके, अरुणा राजू राठोड यांच्यासह अनेक रुग्णांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर काहींनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
बोथबोडन सोबतच हेटी आणि कोलाम पोडावरही डायरियाची साथ सुरू आहे. नळयोजनेला येणारे पाणी तलावातून सरळ विहिरीत आणि तेथून नागरिकांच्या घरी पोहोचते. पाणी शुद्धिकरणाची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना डायरियाची लागन झाल्याचे सांगण्यात येत आहे. सरपंच दिनेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, गावात स्वच्छता मोहीम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
गावकऱ्यांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी माजी सरपंच अनुप चव्हाण यांच्यासह गावकऱ्यांनी मदत केली. (प्रतिनिधी)