डायलिसीस उपचारही जनआरोग्य योजनेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST2019-12-31T05:00:00+5:302019-12-31T05:00:05+5:30

जिल्ह्यात कीडनीचे आजार असलेले रुग्ण संख्येने अधिक आहेत. येथील बहुतांश गावातील पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण असल्याने कीडनीचा आजार बळावतो. शिवाय अतिमद्यसेवन करणाऱ्या रुग्णांनाही डायलिसीसची गरज पडते. पूर्वी डायलिसीसची व्यवस्था शासकीय रुग्णालयात नसल्याने अनेक रुग्ण नागपूर किंवा सेवाग्राम येथे रेफर केले जात होते.

Dialysis treatment through a public health plan | डायलिसीस उपचारही जनआरोग्य योजनेतून

डायलिसीस उपचारही जनआरोग्य योजनेतून

ठळक मुद्दे‘मेडिकल’मध्ये सुविधा : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गरीब व गरजू रुग्णांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचाराची सेवा दिली जाते. जनआरोग्य योजनेंतर्गत डायलिसीसचा उपचार समाविष्ट नव्हता. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील डायलिसीस विभागात आलेल्या गरीब रुग्णांकडे औषधोपचारासाठी लागणारी आर्थिक तजवीजही होत नव्हती. परिणामी या रुग्णांना डायलिसीस घेणे महाग पडत होते. आता शासनाने जनआरोग्य योजनेंतर्गतच डायलिसीसचाही समावेश केला आहे. खऱ्या अर्थाने गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
जिल्ह्यात कीडनीचे आजार असलेले रुग्ण संख्येने अधिक आहेत. येथील बहुतांश गावातील पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण असल्याने कीडनीचा आजार बळावतो. शिवाय अतिमद्यसेवन करणाऱ्या रुग्णांनाही डायलिसीसची गरज पडते. पूर्वी डायलिसीसची व्यवस्था शासकीय रुग्णालयात नसल्याने अनेक रुग्ण नागपूर किंवा सेवाग्राम येथे रेफर केले जात होते. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने पाठपुरावा करून शासनस्तरावरून १२ डायलिसीस मशीन खरेदी केल्या. त्यासाठी स्वतंत्र विभागही तयार करण्यात आला. दोन तंत्रज्ज्ञांच्या भरवशावर या विभागाने आतापर्यंत ८०० वर रुग्णांना कृत्रिम डायलिसीसची सेवा दिली आहे. मात्र डायलिसीससाठी शासकीय रुग्णालयातही लागणारा खर्च ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना न परवडणारा होता. काही रक्कम भरल्याशिवाय हा उपचार घेणे शक्य नव्हते. रुग्णालय प्रशासनाची इच्छा असूनही नियमांमुळे अडचण जात होती. आता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत डायलिसीस खर्चही मंजूर होत असल्याने रुग्णालय प्रशासनापुढचे संकट दूर झाले आहे. शासकीय रुग्णालयात गरीब रुग्णांना जनआरोग्य योजनेतून मोफत डायलिसीसचा लाभ घेता येणार आहे. एका रुग्णाला आठवेळा डायलिसीस करण्याची सुविधा जनआरोग्य योजनेतून झाली आहे. याशिवाय जनआरोग्य योजनेतून सर्जरी, मेडिसीन, इएनटी या विभागाकडूनही दिल्या जाणाºया उपचाराचा खर्च उचलला जातो. कर्णबधिर रुग्णांना जनआरोग्य योजनेतूनच श्रवणयंत्र देण्यात येत आहे. अनेक गरीब रुग्णांनी आतापर्यंत याचा लाभ घेतला आहे. मेडिकलमध्ये इको मशीनही आली असून त्याचा लाभ रुग्णांना मिळत आहे. इको मशीनमुळे हृदयरोगाचे अचूक निदान करणे शक्य होणार आहे. वर्षभरात रुग्णहिताचे अनेक सकारात्मक बदल घडून आले आहेत.

आर्थिक भूर्दंड होणार कमी
कीडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांवर डायलिसीसची गरज पडते. हंगामात सर्पदंश व विषबाधेचे रुग्णही मोठ्या प्रमाणात येतात. यात शेतकरी, शेतमजूर या घटकांचा समावेश सर्वाधिक असतो. त्यांना उपचारादरम्यान डायलिसीस करावे लागते. मात्र आर्थिक स्थिती नसल्याने या रुग्णांना पैशांसाठी भटकावे लागत होते. आता हा उपचार खर्च महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून होणार आहे.

Web Title: Dialysis treatment through a public health plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.