स्वच्छतेचे दिग्रसमध्ये धिंडवडे
By Admin | Updated: November 25, 2014 23:04 IST2014-11-25T23:04:03+5:302014-11-25T23:04:03+5:30
सध्या देशपातळीवर स्वच्छता मोहीम जोरात राबविणे सुरू आहे. ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये पंतप्रधानांपासून तर शालेय शिक्षकांपर्यंत सर्वच जण योगदान देताना दिसत आहे.

स्वच्छतेचे दिग्रसमध्ये धिंडवडे
दिग्रस : सध्या देशपातळीवर स्वच्छता मोहीम जोरात राबविणे सुरू आहे. ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये पंतप्रधानांपासून तर शालेय शिक्षकांपर्यंत सर्वच जण योगदान देताना दिसत आहे. परंतु दिग्रस येथे मात्र नगरपरिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षित धोरणामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. केवळ स्वच्छतेचा आव आणल्या जात आहे. त्यामुळे साथरोगाची शक्यता बळावली
आहे.
जिल्ह्यातील दिग्रस नगरपरिषद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादग्रस्त ठरते. शहरातील नगराध्यक्ष, नगरसेवक केवळ शेखी बघारताना दिसतात. प्रत्यक्ष कृती मात्र त्यांच्याकडून होत नाही. पालिकेचे सध्या स्वच्छतेकडे प्रचंड दुर्लक्ष आहे. त्यामुळे शहराला घाणीचा विळखा बसलेला आहे. जागोजागी नाल्या तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहात आहे. ठिकठिकाणी केरकचऱ्यांचे ढिगारे साचले आहे. त्यामुळे शहरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. अनेकांच्या घरासमोर सांडपाणी साचल्याने स्वच्छतेचा धिंडोरा पिटणाऱ्या नगरसेवकाला धडा शिकवायला पाहिजे, असे मत नागरिक व्यक्त करीत आहे. स्वच्छतेच्या नावाखाली केवळ निधी हडप करण्याचा एक कलमी कार्यक्रम नगरपरिषद राबवित आहे. करारानुसार केरकचरा उचलण्यासंदर्भातील वेगळा करार केला असतानाही संबंधित ठेकेदार मात्र नियमितपणे शहरातून घंटागाड्या नियमित फिरवित नाही. शहरातून कचरा उचलून तीन कि़मी. अंतरावर असलेल्या इम्पिंग ग्राऊंडवर फेकण्याचा तो करार आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी दिग्रस नगरपरिषद कार्यालय नवीन इमारतीत स्थानांतरित झाले तेव्हापासून जुन्या इमारतीकडे दुर्लक्ष होत गेले.
मोकळ्या जागेतच बिनधास्त कचरा फेकण्यात येत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले असून या ढिगांवर मोकाट जनावरे मुक्तसंचार करीत असल्याचे दिसून येतात. याकडे नगरपरिषदेचे नगरसेवक जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता अभियानाचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)