धनगर म्हणतात, घेणारच आरक्षण
By Admin | Updated: August 3, 2014 00:23 IST2014-08-03T00:23:30+5:302014-08-03T00:23:30+5:30
धनगर समाजाची आरक्षण मिळविण्यासाठी तर आदिवासी बांधवांची आरक्षण वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. शनिवारी या दोनही समाजाने काढलेल्या मोर्चावरून ‘ आरक्षण घेणारच’ आणि ‘देणार नाही’ ही भूमिका

धनगर म्हणतात, घेणारच आरक्षण
यवतमाळ : धनगर समाजाची आरक्षण मिळविण्यासाठी तर आदिवासी बांधवांची आरक्षण वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. शनिवारी या दोनही समाजाने काढलेल्या मोर्चावरून ‘ आरक्षण घेणारच’ आणि ‘देणार नाही’ ही भूमिका तिव्रेतेने मांडण्यात आली. दोनही मोर्चे एकाच ठिकाणी पोहोचले तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाला मोर्चेकऱ्यांचा वेढा पडला होता.
‘येळकोट येळकोट जय मल्हार’
धनगर समाज बांधव पोस्टल मैदानात एकत्र आले होते. कपाळी पिवळा मळवट, हाती पिवळे ध्वज, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष, हाती घेतलेले मागण्यांचे फलक, मेंढ्या, घोडे आणि पारंपरिक पेहराव असे धनगर समाज बांधवांच्या धिक्कार मोर्चाचे चित्र होते. केंद्र शासनाने धनगर समाजाला आरक्षणाच्या यादीत घेण्याच्या सूचना दिल्या. मात्र, महाराष्ट्रातील मंत्र्यांंनी विरोध केला. समाजाला आरक्षण देण्यात होत असलेल्या विरोधाचा निषेध नोंदविण्यात आला. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केल्यानंतर एलआयसी चौकात जाहीर सभा घेण्यात आली.
सभेला संबोधित करताना संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या धोरणावर टीका केली. एसटीच्या सवलती मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे समितीचे सचिव संजय शिंदे पाटील यांनी सांगितले. आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना निवडणुकीत धडा शिकवून घरचा रस्ता दाखवावा, असे आवाहन सदबाराव मोहटे यांनी केले. धनगरांची एकजूट कायम राहिल्यास स्थानिक नेत्यांना गावपातळीवरची निवडणुकही जिंकता येणे अशक्य आहे, असे मत डॉ.विकास महात्मे यांनी व्यक्त केले. आम्ही आमचा हक्क मागतो आहे. आरक्षण हा आमचा हक्क आहे. ते मिळेपर्यंत लढत राहू, असे रेणू संजय शिंदे म्हणाल्या. धनगर या शब्दाचा धनगड असा अपभ्रंश झाल्याने धनगर समाजाला आजपर्यंत एसटीचे आरक्षण मिळाले नाही, असे डॉ.संदीप धवने म्हणाले. केंद्राने सुचविल्यानंतरही महाराष्ट्र शासन धनगर समाजाला आरक्षण देण्यास टाळत असल्याचा आरोप बळवंतराव नाईक यांनी केला. ताई कोरटकर, श्रीधर मोहोड, सुरेश शिंदे पाटील, बाळासाहेब शिंदे, अशोक मोटके, जीवन देवकते, पांडुरंग खांदवे, अविनाश जानकर, गजानन डोमाळे, पिंटू शिंदे, आशीष मासाळ, डॉ.रमेश महानूर, दीपक डोमाळे, मनोज गोरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)