ढाबा मालकाकडून तलाठ्यास मारहाण
By Admin | Updated: June 19, 2017 00:57 IST2017-06-19T00:57:06+5:302017-06-19T00:57:06+5:30
शासकीय कामकाजासाठी जाणाऱ्या पोहंडूळ साजाच्या तलाठ्याला ढाबा मालक पिता-पुत्रांनी मारहाण केल्याची घटना

ढाबा मालकाकडून तलाठ्यास मारहाण
दहीसावळीची घटना : पिता-पुत्रावर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरासंगम : शासकीय कामकाजासाठी जाणाऱ्या पोहंडूळ साजाच्या तलाठ्याला ढाबा मालक पिता-पुत्रांनी मारहाण केल्याची घटना महागाव तालुक्यातील दहीसावळी शिवारात घडली. याप्रकरणी महागाव पोलिसांनी पिता-पुत्राविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गौतम विठोबाजी भोगाडे असे मारहाण झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. ते शासकीय कामकाजाकरिता आपल्या मोटरसायकलने नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य मार्गावरून जात होते. गुरूवारी आशिर्वाद ढाब्याचे मालक दीपक श्यामलाल जयस्वाल आणि त्यांचा मुलगा अंकुश दीपक जयस्वाल रा. दहीसावळी यांनी त्यांची दुचाकी अडविली. अश्लिल शिवीगाळ करून नाक्यावर फायटरने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराची माहिती तहसीलदार नामदेव इसाळकर यांना देण्यात आली. याप्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात गौतम भोगाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी दीपक जयस्वाल व अंकुश जयस्वाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.