मारूतीच्या चरणी त्यागला भक्ताने प्राण
By Admin | Updated: August 17, 2014 23:24 IST2014-08-17T23:24:36+5:302014-08-17T23:24:36+5:30
मृत्यू हा अटळ आहे. तो केव्हा आणि कधी कुणाला गाठेल हे सांगता येत नाही. आयुष्यभर मारुतीची पूजा-अर्चा करणाऱ्या एका भक्ताचा मृत्यू मारूतीच्या चरणी झाला. मांगलादेवी येथील मंदिरात पूजा

मारूतीच्या चरणी त्यागला भक्ताने प्राण
मांगलादेवीची घटना : मुलींनी दिला खांदा आणि चितेला भडाग्नी
विनोद कापसे - मांगलादेवी
मृत्यू हा अटळ आहे. तो केव्हा आणि कधी कुणाला गाठेल हे सांगता येत नाही. आयुष्यभर मारुतीची पूजा-अर्चा करणाऱ्या एका भक्ताचा मृत्यू मारूतीच्या चरणी झाला. मांगलादेवी येथील मंदिरात पूजा करताना भोवळ आली आणि मारुतीच्याच चरणी प्राण त्यागला. हा योगायोग अनेकांना चटका लावून गेला तर मुलींनी आपल्या वडिलांच्या तिरडीला खांदा देऊन भडाग्नीही दिला.
रमेश कुंभारखाने असे त्या मारूती भक्ताचे नाव आहे. ग्रामसेवक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या कुंभारखाने यांची मारूतीवर प्रचंड श्रद्धा. दररोज हनुमान मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करायचे. या पूजाअर्चेत कधीही खंंड पडला नाही. शनिवारी नेहमी प्रमाणे ते हनुमान मंदिरात पूजा करण्यासाठी गेले. मात्र मंदिरात जाताच त्यांना भोवळ आली, खाली कोसळले. काही कळायच्या आतच त्यांनी देहत्यागला. मारूतीच्या चरणी प्राण त्यागल्याची माहिती गावात पसरली. अनेकांनी या मंदिराकडे धाव घेतली. मारूती भक्ताचा मारूतीच्या चरणी मृत्यू व्हावा हा योगायोग अनेकांना चटका लावून गेला.
रमेश कुंभारखाने यांना चार मुलीच. मुलगा-मुलगी असा त्यांनी कधी भेद केला नाही. मुला प्रमाणेच चारही मुलींना वाढविले. तीन मुलींचे लग्न लावून दिले. सर्व काही व्यवस्थित असताना नियतीने डाव साधला. रमेशराव यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मुलींनी आपल्या वडिलांना मुलांची कमतरता जाणवू दिली नाही. मुलगी शैलेजा विनोद फोपसे (माणिकवाडा), अनुजा प्रमोद काळे (अलीपूर), उमा अतुल खकाळे (धामणगाव) आणि पूनम रमेश कुंभारखाने (मांगलादेवी) या चौघी बहिणींनी वडिलांच्या तिरडीला खांदा दिला. स्मशानभूमीत पूनम या छोट्या मुलीने चितेला भडाग्नी दिली. त्या ठिकाणी उपस्थित प्रत्येक जण हळहळत होता. मात्र या घटनेतून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश मिळाला.