हद्दवाढ क्षेत्रातील विकास आराखडा सदोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 22:42 IST2017-12-18T22:41:16+5:302017-12-18T22:42:15+5:30
शहराच्या हद्दवाढीनंतर नगरपरिषदेत नव्याने समाविष्ट भागाचा विकास आराखडा तयार करण्यात आला.

हद्दवाढ क्षेत्रातील विकास आराखडा सदोष
यवतमाळ : शहराच्या हद्दवाढीनंतर नगरपरिषदेत नव्याने समाविष्ट भागाचा विकास आराखडा तयार करण्यात आला. यात अनेक चुका असून त्यावर वाढीव क्षेत्रातील नगरसेवकांनी सोमवारी आयोजित बैठकीत आक्षेप नोंदविला. आराखड्यात सत्ताधाºयांच्या परिसरातील विकास कामांवर भर दिला गेला, तर वडगाव, लोहारा सारख्या ग्रामपंचायतींना दुय्यम स्थान दिल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
नगरपरिषद क्षेत्रात भोसा, उमरसरा, लोहारा, वडगाव, वाघापूर, पिंपळगाव, मोहा या सात ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला. त्याला दोन वर्षे लोटली. मात्र, तेथील विकास आराखडा नसल्याने नगरपरिषदेकडून कोणतेच काम करण्यात आले नाही. आता तब्बल दोन वर्षानंतर विकास आराखडा तयार झाला असून ज्या संस्थेला हे काम सोपविले होते, त्या संस्थेकडून अनेक चुका करण्यात आल्या आहे. काही ठराविक भागात अनाठायी कामे प्रस्तावित केली आहे. यावर भाजप व विरोधी बाकावरील नगरसेवकांनी आक्षेप घेतला.
सर्वेक्षणाचे काम करताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्यायला हवे होते, अशी अपेक्षा शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादीच्या नगरसेवकांनी व्यक्त केली. विकास आराखड्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी नगरसेवकांना निमंत्रित केले होते. त्यावेळी विकास आराखडा करणाºया संस्थेकडून प्रेझेंटेशन करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्यावेळी नगरसेवकांनी सांगितलेले रस्ते, खुले भूखंड, पाण्याचे स्त्रोत याची नोंद आराखड्यात नाही यामुळे पुन्हा सर्वेक्षण करुन नगरसेवकांच्या उपस्थितीत नोंदी घ्यावा, अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादीकडून करण्यात आली.
या बैठकीला नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्यासह विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत बरीच गरमागरमी झाली.
मुख्याधिकाऱ्यांच्या मुजोरीने सारेच संतप्त
विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी सीओंनी नगरसेवकांना निमंत्रित केले. मात्र, मुख्याधिकारीच तब्बल दीड तास उशिराने सभागृहात पोहोचले. याबाबत विचारणा केली असता त्यांनी टोलवाटोलवी करून दिलगिरी व्यक्त करणे टाळले. नंतर काही मिनिटातच मुख्याधिकाऱ्यांनी काम असल्याचे सांगून सभागृहातून काढता पाय घेतला. यावरून मुख्याधिकाऱ्यांची शिरजोरी कायम असल्याचे दिसून येते.
मुख्याधिकाऱ्यांची नगरपरिषदेत हुकूमशाही सुरू आहे. त्यांनी विकास आराखडासंदर्भात बैठक बोलावून स्वत: उशिरा आले व निघून गेले. या बैठकीत काहींनी राजकारण आणले. केवळ सूचना करण्यासाठीच ही बैठक होती. तशा सुधारणाही होणार आहे.
- विजय खडसे
गटनेते भाजपा, नगरपरिषद
विकास आराखडा यवतमाळचा नसून केवळ भोसापुरता मर्यादित आहे. यातून दुजाभाव केल्याचे स्पष्ट होते. उर्वरित भाग पालिकेअंतर्गत येत नाही का, असा प्रश्न आहे. पुन्हा सर्वेक्षण करावे.
- अनिल देशमुख
नगरसेवक, काँग्रेस