राजकीय अस्थिरतेतही साधला विकास
By Admin | Updated: September 28, 2016 00:41 IST2016-09-28T00:41:52+5:302016-09-28T00:41:52+5:30
वारंवार तक्रारी, सत्ताधाऱ्यांचा विरोध, दिला जाणारा त्रास अशा कात्रीत आणि राजकीय अस्थिरतेतही केवळ पाच संचालकांच्या भरवशावर समतोल राखत संस्थेचा विकास साधला.

राजकीय अस्थिरतेतही साधला विकास
अभिषेक ठाकरे : घाटंजी बाजार समितीची सभा, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झाले
घाटंजी : वारंवार तक्रारी, सत्ताधाऱ्यांचा विरोध, दिला जाणारा त्रास अशा कात्रीत आणि राजकीय अस्थिरतेतही केवळ पाच संचालकांच्या भरवशावर समतोल राखत संस्थेचा विकास साधला. पाच वर्षांच्या कार्यकाळात बाजार समितीने विकासाचे अनेक टप्पे गाठले, असे सभापती अभिषेक ठाकरे यांनी आमसभेत सांगितले. यावेळी त्यांनी बाजार समितीच्या विकासाचा लेखाजोखा मांडला.
यावेळी मंचावर बल्लू पाटील लोणकर, जितेंद्र मोघे, शंकरराव ठाकरे, संजय इंगळे, मारोती पवार, प्रकाश डंभारे, आशीष लोणकर, रूपेश कल्यमवार, किशोर चवरडोल, रमेश आंबेपवार, नामदेव आडे, अकबर तंवर, विवेक भोयर, गजानन चौधरी, नागोराव कुमरे, रफिकबाबू, निकडे पाटील, अशोक देठे, चंपत आत्राम, तुरपाबाई पुसनाके, विजय कडू, संजय गोडे, माणिक मेश्राम आदी उपस्थित होते.
सभापती ठाकरे पुढे म्हणाले, पाच वर्षांपूर्वी पगाराची सोय नसलेली बाजार समिती आज करोडो रुपयांनी नफ्यात आले आहे. एक रुपयाचेही कर्ज संस्थेवर नाही. व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करणारी ही एकमेव बाजार समिती आहे. शेतकरी हितासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. त्यात १०० टक्के कापूस खरेदी लिलावाद्वारे करण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणीही केली. कापसाचे दर घसरल्यानंतर सीसीआयद्वारा कापूस खरेदी केली. एसएमएस सेवेद्वारे शेतकऱ्यांना दररोजचा दर कळविला जातो. प्रथमच या पाच वर्षात शेतमाल तारण योजना राबविली. जवळपास तीन कोटी रुपये शेतमाल तारण योजनेसाठी तरतूद केली. सद्यस्थितीत वॉल कंपाऊंड, काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)