अतिक्रमणात सामान्यांची घरे उद्ध्वस्त
By Admin | Updated: January 15, 2017 01:08 IST2017-01-15T01:08:04+5:302017-01-15T01:08:04+5:30
येथील नगरपालिकेच्यावतीने शनिवारी दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली.

अतिक्रमणात सामान्यांची घरे उद्ध्वस्त
काही काळ तणाव : चोख पोलीस बंदोबस्तात राबविली मोहीम, अनेक दुकानांवर संक्रांत
वणी : येथील नगरपालिकेच्यावतीने शनिवारी दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. स्थानिक न्यायाधिशांच्या निवासस्थानापासून ते आमदार संजीवरेजड्डी बोदकुरवार यांच्या घरापर्यंत पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. यात गेल्या १५ ते २० वर्षांपासून अतिक्रमीत जागेवर पक्की घरे बांधून वास्तव्य करणाऱ्या अनेकांच्या घरावर बुलडोझर फिरविण्यात आला. परिणामी त्यांचे संसार उघड्यावर आलेत.
या मोहिमेमुळे ज्यांना क्षती पोहचली, त्यांच्यात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान या भागात दुपारी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी १० वाजतापासून तगड्या पोलीस बंदोबस्तात ही मोहिम सुरू करण्यात आली. न्यायाधिशांच्या निवासस्थानापासून अतिक्रमण हटावचा श्रीगणेशा करण्यात आला. या मार्गावर अतिक्रमणात येणाऱ्या जवळपास सर्वच वास्तू उद्ध्वस्त करण्यात आल्यात. काहींनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. ज्यांची पक्की घरे पाडण्यात आली, त्यांनी मुख्याधिकारी दीपक इंगोले यांना घेराव घालून प्रतिष्ठीतांच्याही अतिक्रमीत घरांवर बुलडोझर फिरवावा, अशी मागणी करण्यात आली. सोमवारनंतर पुन्हा अतिक्रमण मोहिम राबविण्यात येणार असून कुणालाही यातून सुट मिळणार नाही, अशी ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर तणाव निवळला. (प्रतिनिधी)