डिटोनेटर्स अप्रशिक्षित मजुरांच्या हाती

By Admin | Updated: May 13, 2015 02:19 IST2015-05-13T02:19:31+5:302015-05-13T02:19:31+5:30

विहिरी खोदण्यासह स्टोन क्रशर आणि खदानींमध्ये वापरण्यात येणारे डिटोनेटर्स अप्रशिक्षित माणसांच्या हाती असून यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे.

Detonators in the hands of untrained laborers | डिटोनेटर्स अप्रशिक्षित मजुरांच्या हाती

डिटोनेटर्स अप्रशिक्षित मजुरांच्या हाती

उमरखेड : विहिरी खोदण्यासह स्टोन क्रशर आणि खदानींमध्ये वापरण्यात येणारे डिटोनेटर्स अप्रशिक्षित माणसांच्या हाती असून यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. सध्या उमरखेड तालुक्यात परप्रांंतीय ट्रॅक्टरसह दाखल झाले असून विना परवाना व्यवसाय करताना दिसत आहे. त्यातच एका परवान्यावर अनेकजण व्यवसाय करताना दिसत आहे.
डिटोनेटर्सच्या वापरासाठी कडक बंधन असतानाही त्याचा खुलेआम उपयोग केला जात आहे. शेतातील विहिरी खोदणाऱ्यांच्याच नावावर रेकॉर्ड लिहिले जाते. विशेष म्हणजे केवळ एकच परवानाधारक व्यावसायिकाच्या नावावर १५ ते २० ड्रिलिंग करणारे ट्रॅक्टर दिसत आहेत. या व्यवसायात परप्रांतीय आणि त्यातही राजस्थानातील नागरिकांचा समावेश आहे. गावात अथवा शेतात विहीर खोलीकरणासाठी स्फोटकांचा वापर केला जातो. प्रत्यक्षात या कामावर ट्रॅक्टरवरील निरक्षण मजूर स्फोटके उडविताना दिसून येतात. सुुरक्षेची कोणतीही साधने न वापरता ही स्फोटके हाताळल्या जातात. उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात आणि शहरातही असा प्रकार दिसत आहे.
स्फोटके सुरक्षितरीत्या ठेवावी लागतात. तसेच ही स्फोटके वस्तीबाहेर सुरक्षितस्थळी ठेवण्याचा नियम आहे. मात्र उमरखेड तालुक्यातील अनेक गावांत भरवस्तीत स्फोटके ठेवली आहे. असामाजिक तत्त्वांच्या हाती ही स्फोटके लागली तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उमरखेड तालुक्यातील अभयारण्य परिसरात डिटोनेटर्सचा वापर करण्यावर बंदी आहे. मात्र या भागातही परप्रांतीयांचे ट्रॅक्टर दिसून येतात. स्फोटके घेऊन फिरणाऱ्या या ट्रॅक्टरमुळे उन्हाळ्याच्या दिवसात भीषण अपघाताची शक्यता असते. मात्र कुणीही या ट्रॅक्टर चालकांना अटकाव करताना तालुक्यात दिसत नाही. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Detonators in the hands of untrained laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.