सुकळीतील शेतकऱ्यांचा शेती न पेरण्याचा निर्धार
By Admin | Updated: March 28, 2016 02:26 IST2016-03-28T02:26:47+5:302016-03-28T02:26:47+5:30
सततची नापिकी व शेतमालाला नसलेला भाव, शासनाचे उदासिन धोरण या सर्व बाबींना कंटाळून आर्णी तालुक्यातील

सुकळीतील शेतकऱ्यांचा शेती न पेरण्याचा निर्धार
आर्णी : सततची नापिकी व शेतमालाला नसलेला भाव, शासनाचे उदासिन धोरण या सर्व बाबींना कंटाळून आर्णी तालुक्यातील सुकळी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन शेतीवरच बहिष्कार टाकून पेरणी न करण्याचा निर्णय घेतला.
गावातील कुणीही यावर्षी आपल्या शेतात पेरणी करणार नाही, असा सामुहिक निर्णय शेतकरी संघटनेची चळवळ उभारणाऱ्या सुकळी या गावाने घेतला. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांनी एकत्र येऊन सर्वसंमत्तीने हा निर्णय घेतला. शेतकरी संटनेचे ‘बळीराज्य’ म्हणून ज्या गावाची ख्याती आहे. ज्या गावामधून जिल्ह्यातील शेतकरी संघटनेला बळ मिळाले होते, आज त्याच गावावर शासनाच्या शेती व शेतकऱ्यांप्रती असलेल्या उदासीन धोरणामुळे पेरणी न करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
सुकळीवासियांनी शासनाकडे काही मागण्याही केल्या आहेत. त्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, पूर्ण शेताला तार कंपाऊंड व्हावे, बियाणे कमी दराने मिळावे आदी प्रमुख मागण्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास ही चळवळ तालुका व जिल्हाभर राबवून शेती न करण्यासाठी इतरांनाही पे्ररित करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी सरपंच सुभाष जाधव, देविदास जाधव, वैकुंठराव मुंडे, विलास जाधव, नामदेव वासरवाड, मोतीसिंग राठोड, राजू मिरासे, संतोष ढोले, प्रमोद कुदळे, विवेक दहीफळे आदींसह असंख्य शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
शासनाकडे केल्या विविध मागण्या
४शासनाचे शेती वरोधी धोरण, निसर्गाचा लहरीपणा, शेतमालाला भाव नसणे या सर्व बाबींना कंटाळून सुकळी येथील शेतकऱ्यांनी आगळा-वेगळा निर्णय घेऊन पेरणी करणार नसल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी शासनाकडे संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. सोबतच बियाण्यांचे भाव कमी करावे, कृषीशी सबंधित अवजारांची, फवारणी औषधांचे भाव कमी करण्याची मागणी केली. शेतीला वन्यप्राण्यांपासून संरक्षण मिळावे हीसुद्धा मागणी करण्यात आली आहे.