ठराव होऊनही करंजीचे कर्मचारी जागीच
By Admin | Updated: September 29, 2016 01:17 IST2016-09-29T01:17:51+5:302016-09-29T01:17:51+5:30
जिल्ह्यातील करंजी रोड (ता. पांढरकवडा) येथे ग्रामीण रूग्णालयाची निर्मिती झाली. तेथील आरोग्य केंद्र वाई येथे हलविण्यात आले.

ठराव होऊनही करंजीचे कर्मचारी जागीच
वाई केंद्र बंदच : आरोग्य समिती झाली हतबल
यवतमाळ : जिल्ह्यातील करंजी रोड (ता. पांढरकवडा) येथे ग्रामीण रूग्णालयाची निर्मिती झाली. तेथील आरोग्य केंद्र वाई येथे हलविण्यात आले. मात्र अद्याप सर्व कर्मचारी करंजी येथेच असून वाई केंद्र सुरू झाले नाही. वारंवार वरिष्ठांशी संपर्क साधूनही केंद्र बंद असल्याने जिल्हा परिषदेची आरोग्य समिती हतबल झाली आहे.
करंजी रोड येथे काही महिन्यांपूर्वी ग्रामीण रूग्णालयाची निर्मिती करण्यात आली. परिणामी तेथील आरोग्य केंद्र लगतच्या वाई येथे हलविण्याचा ठराव समितीने पारित केला. त्यानुसार वाई येथील एका समाज मंदिरात केंद्र सुरू करण्याचे ठरविण्यात आले. मात्र शासन वाई येथे स्वतंत्र वास्तू नसल्याने कर्मचारी पाठविण्यास तयार नाही. परिणामी वाई येथील केंद्र अद्याप बंद असून सर्व कर्मचारी करंजी येथेच बसून असतात. त्यामुळे आरोग्य समिती हतबल झाली आहे.
आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेत बुधवारी समितीची बैठक झाली. त्यावेळी हे सत्य उजागर झाले. बैठकीत आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील रिक्त जागांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या २६ जागा रिक्त आहे. नव्याने १४ वैद्यकीय अधिकारी जिल्ह्यात येणार असून त्यापैकी प्रत्यक्षात किती रूजू होतात, यावरही चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात सध्या व्हायरल फिव्हरची लागण झाली असून कोणतीही साथ नसल्याचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. यासह जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या बांधकाम दुरुस्तीला बैठकीत मंजूरी देण्यात आली. त्यासाठी विविध शिर्षकांखाली निधीची तरतूद करण्यासंदर्भातही चर्चा झाली. (शहर प्रतिनिधी)
वेगावचे केंद्र दोन खोलीत
मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वास्तूचे बांधकाम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरूच आहे. तूर्तास तेथे दोन खोल्यांमध्ये केंद्राचे कामकाज सुरू आहे. वेगावप्रमाणेच वाई येथे समाज मंदिरामध्ये केंद्र सुरू करावे, असा ठरावही पारित करण्यात आला. वारंवार ठराव पाठवून आरोग्य विभाग दाद देत नसल्याने खुद्द सभापतीही जेरीस आले आहे. त्याचप्रमाणे उपकेंद्र बांधकामासाठी शासन निधी उपलब्ध करून देत नसल्याबद्दलही सभापती नरेंद्र ठाकरे यांनी खंत व्यक्त केली.