दाते महिला बॅंकेत अडकलेल्या ठेवीदारांचे पैसे मिळणार परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 22:25 IST2022-11-18T22:25:03+5:302022-11-18T22:25:44+5:30
बाबाजी दाते महिला बँकेचा बँकिंग परवाना आरबीआयने रद्द केला आहे. यानंतर अवसायक म्हणून जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी ठेवीदारांचे पैसे परत देता यावे म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या ठेवीदारांनी ठेवी परत मिळविण्यासाठी अर्ज केले नाही, अशा ठेवीदारांना पैसे परत मिळावे म्हणून मोहीम हाती घेतली आहे.

दाते महिला बॅंकेत अडकलेल्या ठेवीदारांचे पैसे मिळणार परत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बाबाजी दाते महिला सहकारी बँक अवसायनात निघाल्यानंतर अवसायकांनी ठेवीदारांना क्लेम सादर करण्यासाठी १६ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहेे. या बँकेचे ३६ हजार ग्राहक आहेत. त्यांच्या १८५ कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. या ठेवीदारांना पैसे परत मिळविण्यासाठी दोन महिन्याच्या मुदतीत दावे दाखल करावे लागणार आहेत.
बाबाजी दाते महिला बँकेचा बँकिंग परवाना आरबीआयने रद्द केला आहे. यानंतर अवसायक म्हणून जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी ठेवीदारांचे पैसे परत देता यावे म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या ठेवीदारांनी ठेवी परत मिळविण्यासाठी अर्ज केले नाही, अशा ठेवीदारांना पैसे परत मिळावे म्हणून मोहीम हाती घेतली आहे. अशा ठेवीदारांना दोन महिन्यांत क्लेमकरिता अर्ज करण्याची नोटीस बजावली आहे. यामध्ये अवसायकांनी १६ नोेव्हेंबरपासून १६ जानेवारी २०२३ पर्यंतचा कालावधी राखीव ठेवला आहे. या कालावधीत पैसे न मिळालेल्या लाभार्थ्यांना क्लेमसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. यामुळे अनभिज्ञ असलेल्या महिला बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि नांदेड जिल्ह्यातील १९ शाखांमध्ये बँकेचे ३६ हजार ग्राहक आहेत. या ठेवीदारांना पैसे परत मिळावे म्हणून अवसायकाकडून प्राधान्याने प्रयत्न होणार आहे. अशा स्थितीत क्लेम सादर करणाऱ्या लाभार्थ्यांना वसुलीनंतर पैसे मिळणार आहे.
भागभांडवल न मिळालेल्यांना करता येणार दावा
- हे दावे सादर करताना बँकेकडून न मिळालेल्या रिटायरमेंटच्या पैशासह बँकेकडे असलेली शेअर्स थकीत रक्कम आणि ठेवीदाराचे न काढता आलेले पैसे या बाबी दाव्यामध्ये येणार आहेत. अशा विविध प्रकारच्या ग्राहकांना दोन महिन्यांच्या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहेत.
पाच लाखांच्या आतील ठेव प्राधान्याने निकाली निघणार आहे. यानंतर क्रमाक्रमाने दावे निकाली निघणार आहे. त्यासाठी दावे मागविण्यात आले आहेत. वसुलीच्या मोहिमेवर प्रथम लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ठेवीदारांचा प्रत्येक पैसा परत करण्यावर भर राहणार आहे.
- नानासाहेब चव्हाण, अवसायक, बाबाजी दाते महिला बँक, यवतमाळ