ब्राह्मणवाडा परिसरातील गावांत डेंग्यूसदृश आजाराचे थैमान
By Admin | Updated: October 18, 2014 23:01 IST2014-10-18T23:01:21+5:302014-10-18T23:01:21+5:30
तालुक्यातील ब्राह्मणवाडा, वाळकी, माणिकवाडा या तिन्ही गावात डेंग्यूसदृश आजाराने कहर केला असून अनेक रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ब्राह्मणवाडा परिसरातील गावांत डेंग्यूसदृश आजाराचे थैमान
नेर : तालुक्यातील ब्राह्मणवाडा, वाळकी, माणिकवाडा या तिन्ही गावात डेंग्यूसदृश आजाराने कहर केला असून अनेक रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातच ब्राह्मणवाडा येथील ३० वर्षीय महिलेचा डेंग्यूसदृश आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. मात्र अद्याप डेंग्यूसदृश आजारावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले नाही.
तालुक्यातील ब्राह्मणवाडा (पूर्व) या गावाला हागणदारीमुक्ती निर्मल ग्राम योजना, हरियाली योजना व तंटामुक्त पुरस्कार मिळाला. प्रत्यक्षात या गावाची स्थिती दयनीय असून अस्वच्छतेचा साम्राज्य आहे.
जागोजागी अस्वच्छ पाण्याचे डबके साचले असून ज्या विहिरीतून नळयोजनेला पाणीपुरवठा होतो त्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत नाही. भारनियमनाचे व कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याचे कारण सांगत टाकीत साठवून ठेवलेले पाणी गावकऱ्यांना प्यावे लागते. पाण्याच्या टाकीत कचरा साचला असून ग्रा.पं.ने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. एवढे पुरस्कार मिळूनही सदर गाव विकासापासून कोसो दूर असून स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहे.
गावातील दुर्गा अमृत चर्जन (३०) हिला काही दिवसांपूर्वी डेंग्यूसदृश आजाराने ग्रासले होते. यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. तिला नऊ महिन्याचे बाळ असून मातेच्या निधनामुळे सदर बालक पोरके झाले. अत्यंत शोकाकूल वातावरणात दुर्गा चर्जन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ब्राह्मणवाडा येथील मनोज संतोष जाधव (६), प्रणय संजय कांबळे (१०), तेजस संजय कांबळे (१२), विनोद भीमराव राठोड (५) रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
तसेच माणिकवाडा येथेही ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे पाणी पुरवठा सदोष असल्याने आशिष अविनाश रामटेके (९) व इतर अनेकांना डेंग्यूसदृश आजाराने ग्रासले आहे. परिसरातील अनेक गावांवर डेंग्यूसदृश आजाराने कहर केला असून तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे. मात्र या आजाराने तालुक्यातील नागरिक भयभीत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. असे असले तरी अद्याप आजार नियंत्रणात आरोग्य यंत्रणेला यश आले नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)