विदर्भ राज्याची मागणी सर्वात जुनी
By Admin | Updated: November 15, 2014 22:53 IST2014-11-15T22:53:51+5:302014-11-15T22:53:51+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी महाराष्ट्र, मुंबई व इतर राज्यांच्या मागणीपेक्षाही जुनी असल्याचे प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालय (दिल्ली) चे अधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केले.

विदर्भ राज्याची मागणी सर्वात जुनी
श्रीहरी अणे : ‘स्वतंत्र विदर्भाची आर्थिक व कायदेशीर बाजू’वर व्याख्यान
यवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी महाराष्ट्र, मुंबई व इतर राज्यांच्या मागणीपेक्षाही जुनी असल्याचे प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालय (दिल्ली) चे अधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केले.
लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात आयोजित ‘जाणून घेऊया, स्वतंत्र विदर्भाची आर्थिक व कायदेशीर बाजू’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार दिवाकरराव पांडे होते. प्रमुख पाहुणे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. राजेश चव्हाण, अॅड. रुपेश अमरावत, अॅड. बालाजी येरावार, प्राचार्य डॉ. विनायक भिसे, अॅड. मुकेश समर्थ उपस्थित होते.
विदर्भ राज्य अतिशय प्राचीन आहे. आज राज्यकर्ते मराठी भाषिक दोन किंवा त्यापेक्षा अधिक राज्य नको असे सांगतात. ते धादांत खोटे असून इतिहासाशी साधर्म्य सांगणारे नाही. १८७० साली नागपुरात भोसलेंचे राज्य होते. त्याचवेळी मराठवाड्यात आजच्या मध्य प्रदेशात व इतरत्र मराठ्यांचे मराठी राज्य अस्तित्वात होते. त्यापूर्वी १८५६ मध्येही सी पी अॅन्ड बेरार नावाने हा प्रांत वेगळा होता. त्यावेळी नागपूर हीच विदर्भाची राजधानी होती. १९०५ साली इंग्रजांनीसुद्धा स्वतंत्र विदर्भासाठी प्रयत्न केलेले आढळतात. १९३८ साली तसा ठराव पारित झाला होता. १९४७ साली अकोला करार झाला होता. परंतु या कराराची अंमलबजावणीच झाली नाही. १९२७ मध्ये मद्रास येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनातसुद्धा विदर्भ राज्याचा ठराव पारित झाला होता. याबाबत नेमण्यात आलेल्या जेव्हीपी कमेटीने स्वातंत्र्यानंतर १९४८ साली स्वतंत्र विदर्र्र्र्भाची शिफारस केली होती. या कमेटीत जे म्हणजे जवाहरलाल नेहरू आणि व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल हे होते. असे असताना ही मागणी पुन्हा मागे पडल्याचे अॅड. अणे म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा विदर्भाचे अस्तित्व कायम ठेवा, असे घटनेत सांगितल्याचे त्यांनी म्हटले. विदर्भाची आर्थिक स्थिती यापूर्वीसुद्धा अतिशय चांगली होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखे प्रकार शासनाच्या नाकर्तेपणामुळे आता घडत असल्याचे ते म्हणाले. संयुक्त चळवळ ही मुंबईसाठी होती ती विदर्भासाठी नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. आज ‘जय विदर्भ’म्हणण्यावरसुद्धा आक्षेप घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला जय महाराष्ट्र म्हणण्याचाही अभिमानच आहे. परंतु विदर्भ वेगळा हवा असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी प्राचार्य शंकरराव सांगळे, रेखा कोठेकर आदींसह शहरातील वकील व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)