संथारावरील बंदी हटविण्याची मागणी
By Admin | Updated: August 26, 2015 02:41 IST2015-08-26T02:41:02+5:302015-08-26T02:41:02+5:30
प्राचीन काळापासून जैन धर्मात संथारा व्रत परंपरा सुरू आहे. या प्राचीन परंपरेवर राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी आणली.

संथारावरील बंदी हटविण्याची मागणी
पांढरकवडा : प्राचीन काळापासून जैन धर्मात संथारा व्रत परंपरा सुरू आहे. या प्राचीन परंपरेवर राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी आणली. हा निर्णय जैन धर्मीयांसाठी अयोग्य आहे. त्याचा पुर्नविचार करून ही बंदी हटविण्यात यावी, अशी मागणी राजेंद्र पितलीया यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
भगवान महावीरांच्या पूर्वीपासूनच्या काळात जैन धर्मात संथारा व्रत परंपरा सुरू आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण जैन धर्मीयांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. संथारा व्रताची तुलना आत्महत्या व सती प्रथा, यांच्याशी करणे अयोग्य आहे. कोणतााही व्यक्ती निराशा, कुंठा, मानसिक असंतुलन व इतर प्रतिकूल परिस्थितीत आत्महत्या करतो. सती प्रथेत पतीच्या निधनानंतर पत्नी शोककळेत आपले जीवन संपविते. मात्र संथारा व्रत परंपरेत कोणत्याही स्वस्थ व्यक्तीला संथारा व्रत दिले जात नाही. आजारपणात एखाद्या व्यक्तीची शारीरिक क्रिया एकदम मंद झाली असेल, तसेच आहार, पाणी बंद झाले असेल, ते काहीही ग्रहण करीत नसेल, तरच त्या व्यक्तीच्या इच्छेने व कुटुंबातील अन्य सदस्यांच्या सहमतीने संथारा व्रत दिले जाते. संथारा व्रत अनिवार्य नसते. संथारा घेणाऱ्या व्यक्तीची धार्मिक भावना मोक्ष प्राप्त करण्याची असते. यामुळे संथारा व्रताला अन्य कोणत्याही क्रियेशी जोडणे योग्य नाही. राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय जैन धर्मात आंतरिक हस्तक्षेप असल्याचा आरोप त्यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)