स्वतंत्र कर्करोग विभाग निर्मितीची मागणी
By Admin | Updated: November 2, 2015 01:53 IST2015-11-02T01:53:44+5:302015-11-02T01:53:44+5:30
येथे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुसज्ज असले तरी अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे.

स्वतंत्र कर्करोग विभाग निर्मितीची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : विदर्भ युथ आॅर्गनायझेशनने मांडली गरीब रुग्णांची समस्या
यवतमाळ : येथे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुसज्ज असले तरी अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. विशेष म्हणजे कर्करोगाचे रुग्ण वाढत असून स्वतंत्र कर्करोग विभाग सुरू करण्याची मागणी विदर्भ युथ आॅर्गनायझेशनने केली आहे.
शनिवारी ३१ आॅक्टोबर रोजी विदर्भ युथ आॅर्गनायझेशनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात या मागणीचे निवेदन सादर केले. यवतमाळ जिल्हा विस्ताराने मोठा आहे. लोकसंख्याही मोठी असून जिल्हा आदिवासीबहुल आहे. यवतमाळ जिल्हाच नव्हेतर शेजारच्या जिल्ह्यातूनही अत्यवस्थ रुग्ण यवतमाळात येतात. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कर्करोग विभागाची आवश्यकता आहे. येथील उपजिल्हा रुग्णालय तथा तालुका पातळीवरील रुग्णालयात सोनोग्राफीची सोय नाही. वैद्यकीय महाविद्यालयातही एकच सोनोग्राफी आहे. त्यामुळे गरोदर महिलांची गैरसोय होत आहे. कधी कधी सोनोग्राफीसाठी महिनामहिना नंबरच लागत नाही. खासगी रुग्णालयात पैसे मोजून या सुविधा मिळवाव्या लागतात. त्यामुळे इतर आवश्यक सुविधांसोबतच जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कर्करोग विभाग तातडीने सुरू करावा, अशी मागणी विदर्भ युथ आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष रजा शेख, दीपक यंगड, सुरेश खैनवार, अहमद शकील अहमद कादर, रिजवानी अकबानी, अमीन पटेल आदींनी केली आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)