६३ लाखांचा गंडा घालणारे दिल्लीचे ठग जेरबंद

By Admin | Updated: March 1, 2016 01:59 IST2016-03-01T01:59:55+5:302016-03-01T01:59:55+5:30

विमा कंपनीत जमा रकमेच्या कमिशनचा थेट लाभ पॉलिसीधारकाला देण्याचे आमिष देऊन यवतमाळातील एका ....

Delhi's swindler jerband, who lent 63 lakhs | ६३ लाखांचा गंडा घालणारे दिल्लीचे ठग जेरबंद

६३ लाखांचा गंडा घालणारे दिल्लीचे ठग जेरबंद

दोन वर्षांपूर्वीचा गुन्हा : यवतमाळात फसवणूक, ११ बँक खाते गोठविले
यवतमाळ : विमा कंपनीत जमा रकमेच्या कमिशनचा थेट लाभ पॉलिसीधारकाला देण्याचे आमिष देऊन यवतमाळातील एका व्यावसायिकाला ६३ लाखांचा गंडा घालणाऱ्या दिल्ली येथील दोन ठगांना यवतमाळ पोलिसांनी अटक केली. दोन वर्षापूर्वी घडलेल्या या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.
मधुकर देवराव रानडे (७३) रा. दहिवलकर ले-आऊट यवतमाळ असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सचिन विनोदकुमार गोयल (२८) रा. सीताराम बाजार दिल्ली, रतीपाल सुरेशकुमार चौधरी (३०) रा. दिल्ली असे अटकेतील दोन ठगांचे नाव असून इतर दोन जण पसार आहे. यवतमाळातील रानडे यांना या चौघांनी फोन करून विमा पॉलिसीबद्दल विस्तृत माहिती दिली. विमा पॉलिसीधारकाच्या लाभातूनच एजंटचे कमिशन कापण्यात येते. त्यामुळे मोठी रक्कम वाया जाते. हा प्रकार टाळून थेट पॉलिसीधारकाला कमिशन देण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी होणाऱ्या प्रक्रियेवर खर्च येतो. ती रक्कम आमच्या खात्यात जमा करा असे सांगितले. याला भुलून रानडे यांनी आरलाईफ या कंपनीच्या नावाने असलेल्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. कधी त्यांनी धनादेश तर कधी रोख रक्कम आरोपीच्या खात्यात टाकली.
मात्र काही दिवसातच आपली फसवणूक होत असल्याचे रानडे यांच्या लक्षात आले. १४ जुलै २०१४ रोजी त्यांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तेव्हा त्यांच्याकडे आरोपीकडून आलेला फोन क्रमांक आणि बँक खाते क्रमांक इतकीच माहिती होती. पोलीस तपासही पुढे सरकला नाही. अखेर प्रलंबित हे प्रकरण वर्षभरापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी देण्यात आले. उपलब्ध माहितीवरून शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुगत पुंडगे, सचिन हुमने, साजीद खान, आशिष चौबे, कविश वाळेकर यांनी आठ महिन्यापूर्वी तपासाला सुरुवात केली. यात पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी विशेष मार्गदर्शन केले. दिल्ली आरोपींच्या शोधात गेलेल्या पथकाला दिल्ली पोलिसांचे सहकार्य मिळाले.
दरम्यान १९ फेब्रुवारीला पहिला आरोपी सचिन विनोदकुमार गोयल आणि २६ फेब्रुवारीला दुसरा आरोपी रतीपाल सुरेशकुमार चौधरी याला अटक करण्यात यश आले. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी पसार आहे. यवतमाळात फसवणूक झालेल्या प्रकरणाचा दोन वर्षानंतर छडा लागून आरोपी जेरबंद झाले आणखी दोघांना लवकरच अटक होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

फसवणुकीच्या रकमेतून परदेशात मौजमजा
दिल्ली येथून अटक केलेल्या सचिन गोयल आणि रतिपाल चौधरी व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी फसवणुकीतून मिळविलेल्या रकमेतून परदेशात मौजमजा केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. बँकॉक, उझबेकीस्थान, दुबई या ठिकाणी जाऊन त्यांनी हा पैसा उधळला.
दिल्लीत पोलिसांनी या महाठगांना अटक केल्यानंतर त्यांची विविध बँकेतील ११ खाती सील केले आहे. त्यांच्याकडून आठ लाख रुपये किंमतीच्या दोन कार जप्त करण्यात आल्या. रोख रक्कम मात्र पोलिसांच्या हाती लागली नाही.
या दोघांना यवतमाळ पोलिसांनी सोमवारी न्यायालयापुढे हजर केले. त्यावेळी त्यांना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या आरोपींकडून इतर गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: Delhi's swindler jerband, who lent 63 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.