नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक लांबल्याने इच्छुकांचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:39 AM2021-03-07T04:39:09+5:302021-03-07T04:39:09+5:30

राळेगाव : नगरपंचायतची होऊ घातलेली निवडणूक शासनाच्या पुढील आदेशापर्यंत लांबली आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग व पुढे पावसाचे ...

The delay in the general election of Nagar Panchayat shattered the dreams of the aspirants | नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक लांबल्याने इच्छुकांचे स्वप्न भंगले

नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक लांबल्याने इच्छुकांचे स्वप्न भंगले

Next

राळेगाव :

नगरपंचायतची होऊ घातलेली निवडणूक शासनाच्या पुढील आदेशापर्यंत लांबली आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग व पुढे पावसाचे चार महिने याप्रमाणे दसरा-दिवाळीपर्यंत या निवडणुका लांबणार, असे दिसत आहे.

निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून येथील सतरा प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले होते. प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर आक्षेप, हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. अधिकाऱ्यांनी त्याचा निपटारा केला होता. अंतिम मतदारयादीची प्रसिद्धी व मतदान केंद्रांची प्रसिद्धी आगामी दिवसांत केली जाणार होती. या महिन्यात केव्हाही निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो, या आशेवर सतराही प्रभागातील सर्वच पक्ष, आघाड्या व अपक्ष याप्रमाणे दोनशेच्यावर उमेदवार मतदारसंघात फिरू लागले होते. मतदारांशी जनसंपर्क वाढला होता, विचारपूस वाढली होती.

काहींनी दोन-दोन प्रभागांतून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती. मतदारांना प्रभावित करण्यासाठी विविध प्रयोग करण्यास सुरुवात झाली होती. काही उमेदवारांत दानशूरपणा प्रकटण्यास सुरुवात होऊन धर्मराजाचे अवतार बनण्याची खेळी सुरू झाली होती.

आगामी निवडणूक लढवायची, जिंकायची व नगरसेवक बनायचेच, असा चंग अनेक उमेदवारांनी बांधला होता. नगरसेवक नंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतीपदी बसण्याची स्वप्ने या इच्छुक उमेदवारांना पडू लागली होती. पण, आता या निवडणुका लांबल्याने त्यांची स्वप्ने विखुरली आहेत.

बॉक्स

नगरपंचायतवर अधिकारीराज

नगरपंचायतवर प्रशासकीय राजवट आता पुढील काळापर्यंत कायम राहणार आहे. गतकाळात काही निर्णय प्रतिनिधींच्या आगमनापर्यंत रोखून ठेवण्यात आले होते. त्या सर्वांना आता गती द्यावी लागणार आहे. पुढील महिन्यापासून पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आठ-दहा दिवसांआड होणारा नळयोजनेचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने वेगाने उपाययोजना कराव्या लागणार आहेत. मेनरोडसह रस्त्यांंची स्थिती सुधारण्यासाठी, स्वच्छता अभियानास परिणाम व शिस्त लावून गती देण्यास ठोस प्रयत्नांची आवश्यकता राहणार आहे.

Web Title: The delay in the general election of Nagar Panchayat shattered the dreams of the aspirants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.