वीज अभियंत्याच्या खुर्चीला हार
By Admin | Updated: May 6, 2015 01:50 IST2015-05-06T01:50:55+5:302015-05-06T01:50:55+5:30
तालुक्यात भारनियमनाचा अतिरेक झाला आहे. याशिवाय वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे.

वीज अभियंत्याच्या खुर्चीला हार
नेर : तालुक्यात भारनियमनाचा अतिरेक झाला आहे. याशिवाय वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. शिवाय विद्युत कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तक्रारीची दखलही घेतली जात नाही. याप्रकाराने संतप्त झालेल्या माणिकवाडा (धनज) येथील नागरिकांनी मंगळवारी विद्युत कंपनीच्या येथील कार्यालयावर धडक दिली. यावेळी कुणीही अधिकारी हजर नसल्याने सहाय्यक अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त केला.
माणिकवाडा (धनज) परिसरात दररोज १२ तासांचे भारनियमन सुरू आहे. शिवाय वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. तीव्र उन्हामुळे घामाच्या धारा लागत असल्याने आजार जडण्याची भीती आहे. शिवाय शेती पिकाला पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यासंदर्भात विद्युत कंपनीच्या कार्यालयाकडे वारंवार तक्रार केली. याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे
नागरिक कार्यालयावर धडक दिली आहे.
विद्युत विभागाचे अधिकारी, कर्मचारी कार्यालयातून बेपत्ता होते. त्यामुळे नागरिक अधिक संतापले. काळ््या फिती लावून घोषणाबाजी केली. दोन तासपर्यंत कुणीही फिरकले नाही.
अखेर याप्रकाराचा निषेध नोंदवत सहाय्यक अभियंत्याच्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त केला. यावेळी राहुल सोहर, शैलेश हुड, हेमराज गोल्हर, सचिन लोखंडे, सुधीर सरडे, किशोर दाभीरे, मनोज जोल्हे, अरूण तिखे, प्रकाश रोकडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
यासंदर्भात विद्युत कंपनीच्या येथील कार्यालयाचे सतीश कानडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, कंपनीने ठरविलेल्या वेळेनुसारच भारनियमन केले जाते. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. चर्चा करूनच आंदोलनाचा निर्णय घेणे योग्य राहिल असे मत त्यांनी मांडले. (तालुका प्रतिनिधी)